मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खाननं भारतात प्रजासत्ताक दिन साजरा केल्यानंतर, रविवारी 26 जानेवारीच्या रात्री अबू धाबी येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली. या कार्यक्रमात त्यानं त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती उघड केली. शाहरुखनं त्याच्या आगामी चित्रपटामधील दिग्दर्शकाच्या नावाचा खुलासा केला. अबू धाबीमध्ये आयोजित ग्लोबल व्हिलेज कार्यक्रमात शाहरुख खाननं खूप धमाल केली. त्यानं स्टेजवर असणाऱ्या होस्टच्या प्रश्नांची उत्तरे देताना, त्याच्या आगामी 'किंग' चित्रपटाबद्दल एक अपडेट शेअर केली. त्याचा 'किंग' चित्रपट सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित करणार असल्याचं त्यानं सांगितलं. 2023चा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पठाण' सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. या कार्यक्रमात, शाहरुखनं सर्वांना सांगितलं की, त्याचा आगामी चित्रपट खूप मनोरंजक असेल.
शाहरुख खान दिली किंग चित्रपटाबद्दल विशेष माहिती :शाहरुख खानच्या एका फॅन पेजनं या कार्यक्रमातील एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये 'किंग खान' म्हणतो, "मी सध्या शूटिंग करत आहे. मी काही महिने शूट करेन. माझा दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद खूप कडक आहे. त्यानं पठाण बनवला होता. त्यानं मला सक्त ताकीद दिली की, आपण काय करत आहोत, हे कोणालाही सांगायचं नाही. त्यामुळे चित्रपटात काय करत आहोत हे मी सांगू शकत नाही. पण मला खात्री आहे की हे खूप मनोरंजक असेल. खूप मजा येईल."