मुंबई - Lok Sabha election 2024 : बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्तने 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केलं आहे. देशात आज 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान होत असून, मुंबईत आज सकाळपासून मतदान सुरू आहे. इकडे वांद्रे पश्चिम येथील पाली हिल भागात असलेल्या मतदान केंद्रावर संजय दत्त मतदान करण्यासाठी आला होता. या नंतर बॉलिवूमध्ये बाबा नावानं ओळखला जाणाऱ्या संजय दत्तनं सर्व मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं.
मतदान केल्यानंतर संजय दत्त काय म्हणाला?
संजय दत्त पांढऱ्या आणि हिरव्या प्रिंटेड शर्टमध्ये मतदान करण्यासाठी आला होता. मतदान केल्यानंतर संजय दत्तला त्याने कोणत्या आधारावर मतदान केलं असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा याला उत्तर देताना अभिनेता संजूबाबा म्हणाला, "मी लोकांना घराबाहेर पडून मतदान करण्याचं आवाहन करु शकतो. मी राजकारणी नाही, मी फक्त देशाच्या भल्यासाठी मतदान करण्यासाठी आलो आहे. मला काम करायचंय, चांगले चित्रपट बनवायचे आहेत...बस."
संजय दत्तचे दिवंगत वडील आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता सुनील दत्त आणि त्याची बहिण प्रिया दत्त हे एकेकाळी खासदार होते, पण संजय दत्तने कधीही राजकारणात प्रवेश करण्याची आपली इच्छा व्यक्त केली नाही किंवा निवडणूकही लढवली नाही. संजय दत्त असं मानतो की तो सामान्य व्यक्तीप्रमाणे आयुष्य जगतो आहे आणि चित्रपटांमध्ये काम करून त्याच्या चाहत्यांचं मनोरंजन करतो.