मुंबई - Sarfira Movie : हिंदी चित्रपटसृष्टीचा 'खिलाडी' अक्षय कुमार एकामागून एक चित्रपटांची घोषणा करत आहे. सध्या तो आगामी चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हा चित्रपट एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. आता अक्षय कुमारनं त्याच्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. आज 13 फेब्रुवारी रोजी अक्षयनं त्याच्या मोस्ट अवेटेड चित्रपटाचं शीर्षक जाहीर केलं. त्याचा हा आगामी चित्रपट साऊथ सुपरस्टार सूर्या स्टारर 'सोरारई पोटरु'चा हिंदी रिमेक आहे. अक्षय अभिनीत या चित्रपटाचं नाव 'सराफिरा' असं आहे. अक्षयनं 'सरफिरा' चित्रपटाचा टीझरही रिलीज केला आहे. या टीझरमध्ये अक्षय कुमारचा फर्स्ट लूकही दिसत आहे. याशिवाय चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.
अक्षयचा 'सरफिरा' चित्रपट : साऊथचा सुपरस्टार सूर्याबरोबर 'सोरारई पोटरु' हा चित्रपट बनवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुधा कोंगारा प्रसाद यांनी 'सरफिरा'चं दिग्दर्शिन केलंय. अक्षय कुमारचा 'सोरारई पोटरु'चा हिंदी रिमेक प्रोजेक्ट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. अखेर त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली आणि आता हा चित्रपट 12 जुलै 2024 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारशिवाय राधिका मदन, परेश रावल आणि सीमा बिस्वास हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट सुधा आणि शालिनी उषादेवी यांनी एकत्रितपणे लिहिला आहे. याशिवाय या चित्रपटामधील संवाद लिहिण्याचे काम पूजा तोलानी यांनी केलं आहे.