हैदराबाद - दक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह गेल्या काही आठवड्यापासून चर्चेत आहे. अखेर त्यांच्या लग्नाचा दिवस उजाडला असून यादरम्यान नागा चैतन्या आणि त्याची माजी पत्नी सामंथा रुथ प्रभू यांच्या लग्नातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर नेटिझन्स वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या प्रतिक्रिया देताना दिसतात. सोशल मीडियावर काही नेटिझन्स सामंथाला हे फोटो डिलीट करण्याचा सल्ला देत आहेत.
सामंथा आणि नागाच्या लग्नाचे फोटो व्हायरल
सामंथा आणि नागा चैतन्य यांचे लग्न सात वर्षापूर्वी 2017 मध्ये झालं होतं. हा एक भव्य सोहळा होता. मात्र त्याचं हे लग्न केवळ चार वर्ष टिकलं आणि 2021 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. आता नागा चैतन्य आपली प्रेयसी शोभिता धुलीपालाशी लग्न करत आहे. दरम्यान, नागा आणि सामंथा यांच्या ख्रिश्चन रितीरिवाजानुसार झालेल्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत. एका फोटोमध्ये सामंथा नागाचं चुंबन घेताना दिसत आहे. सामांथानं नागाच्या वाढदिवसानिमित्त हा फोटो पोस्ट केला होता. याच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं होतं, "हॅप्पी बर्थडे माय एव्हरीथिंग, मी शुभेच्छा मागत नाही तर दररोज प्रार्थना करते की, देव तुला जे हवं आहे ते देवो."