मुंबई Salman Khan Left The Bull :अभिनेता सलमान खान आणि निर्माता करण जोहर 25 वर्षांनंतर 'द बुल' या चित्रपटातून एकत्र काम करणार होते. या चित्रपटासाठी सलमान खूप मेहनत करत असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. आता 'द बुल'बाबत एक अपडेट समोर आली आहे. या चित्रपटाची शूटिंग गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होती. अनेकदा शूटिंगची डेट पुढं ढकलण्यात आली. दरम्यान करण जोहरच्या या ॲक्शन चित्रपटातून सलमान खाननं माघार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सलमाननं हा चित्रपट का सोडला, यामागचं आता खर कारण समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार करण जोहरनं सलमानला जुलैपर्यंत मुदतवाढ मागितली होती.
सलमान खाननं करण जोहरचा चित्रपट सोडला :करण जोहर आणि दिग्दर्शक विष्णुवर्धन अजूनही शूटिंगची योग्य डेट ठरवू शकले नाहीत. तसेच सलमानकडं साजिद नाडियादवाला आणि एआर मुरुगादॉस यांच्याबरोबरचा आगामी प्रोजेक्ट देखील आहे, ज्याचं शूटिंग मे 2024 मध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे 'भाईजान'नं करणच्या प्रोजेक्टमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. 'द बुल' चित्रपटामध्ये तो ब्रिगेडियर फारुख बुलसाराची भूमिका साकारणार होता, ज्यासाठी त्यानं निमलष्करी दलांबरोबर प्रशिक्षणही घेत होतं. याशिवाय त्यानं आपल्या आहारातही किरकोळ बदल केला होता. 'द बुल' चित्रपट हा बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता. सलमान खान मे महिन्यात साजिद नाडियादवालाच्या प्रोजेक्टमध्ये व्यग्र असणार आहे.