मुंबई :अभिनेता अजय देवगण आणि चित्रपट निर्माता रोहित शेट्टी सध्या 'सिंघम अगेन'च्या रिलीजसाठी सज्ज आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत. हा चित्रपट दिवाळी 2024 च्या मुहूर्तावर म्हणजेच 1 नोव्हेंबर रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे. 'सिंघम अगेन'च्या भव्य प्रदर्शनापूर्वी 'सिंघम' हा चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये दाखल होत आहे. रोहित शेट्टीचा 'सिंघम' पुन्हा रिलीज होत असल्यानं अनेकजण खूश आहेत. 'सिंघम' या चित्रपटातून कॉप युनिव्हर्सची सुरुवात रोहित शेट्टीनं केली होती.
'सिंघम' होणार पुन्हा प्रदर्शित : रोहित शेट्टीचा 'सिंघम' चित्रपट रुपेरी पडद्यावर 13 वर्षांनंतर पुन्हा रिलीज होत आहे. अजय देवगण स्टारर 'सिंघम' चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. रोहितनं त्याच्या स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, 'दिवाळीत पूर्ण ताकदीनं येण्यापूर्वी! हे सर्व कसे सुरू झाले याचा अनुभव घ्या. 'सिंघम अगेन'च्या आधी 'सिंघम'चा अनुभव घ्या. 18 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित होत आहे.' 'सिंघम' हा चित्रपट अनेकांना आवडला होता. या चित्रपटामधील डायलॉग आणि गाणी देखील खूप हिट झाली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता. 'सिंघम' चित्रपटामध्ये ऑक्टेन ॲक्शन सीन्स हे देखील प्रेक्षकांना खूप पसंत पडले होते.