मुंबई- Ranveer Singh :अभिनेता रणवीर सिंगनं त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आज 27 जुलै रोजी 'उरी - द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धरबरोबर त्याच्या प्रोजेक्टची घोषणा केली आहे. या प्रोजेक्टबद्दल बऱ्याचं दिवसांपासून चर्चा सुरू होती. रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या प्रोजेक्टचं नाव 'धुरंधर' असल्याचं म्हटलं जात आहे. 'धुरंधर' हा एक मास ॲक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे. आज या चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टवरून पडदा हटवण्यात आला आहे. हा एक मल्टीस्टारर चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग व्यतिरिक्त संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना आणि अर्जुन रामपाल हे कलाकार दिसणार आहेत.
चित्रपटात दिसणार 'ही' अभिनेत्री : रणवीर सिंग आणि आदित्य धर यांच्या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांनी सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटामध्ये आदित्यनं पत्नी यामी गौतमला कास्ट केलंय. 'धुरंधर' चित्रपटामध्ये प्रेक्षकांना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. दरम्यान रणवीर सिंगनं या प्रोजेक्टबद्दल पोस्ट शेअर करताना लिहिलं, "हे माझ्या चाहत्यांसाठी आहे, ज्यांनी माझ्यासाठी खूप धीर धरला आणि या क्षणाची वाट पाहिली, मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो, मी तुम्हाला वचन देतो की, मी तुमच्यासाठी चांगला चित्रपट घेऊन येईल. याआधी, तुमच्या आशीर्वादानं, आम्ही एका नव्या सुरुवातीच्या दिशेनं वाटचाल करत आहोत."