मुंबई - Ranveer Singh : सध्याच्या काळात बॉलिवूड सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. रश्मिका मंदान्नापासून ते कतरिना कैफ पर्यंतचे डीपफेक व्हिडिओ समोर आले आहेत. याआधी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. अलिकडेच निवडणुकीदरम्यान आमिर खान एका राजकीय पक्षाचा प्रचार करत असल्याचा डीपफेक व्हिडिओ समोर आला होता. आता रणवीर सिंगही डीपफेकचा बळी ठरला आहे. रणवीर सिंग हा एका राजकीय पक्षाचा प्रचार करताना व्हिडिओत दिसत आहे. रणवीरनं या बनावट व्हिडिओवर मुंबई पोलिसांच्या सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे.
डीपफेक व्हिडिओवर रणबीरनं केली कारवाई : रणवीर सिंगच्या अधिकृत प्रवक्त्यानं याबद्दल पुष्टी केली आहे की, या डीपफेक व्हिडिओवर कारवाई करण्यात आली आहे. रणवीरच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, "रणवीर सिंगच्या एआय व्युत्पन्न डीपफेक व्हिडिओची जाहिरात करणाऱ्या हँडलविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे." दरम्यान लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी रणवीर सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तो पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत होता. रणवीरचा हा व्हिडिओ वाराणसीमधील होता. या व्हिडिओमध्ये रणवीर हा बेरोजगारी, महागाईबद्दल बोलताना दिसला होता. याशिवाय त्यानं व्हिडिओमध्ये काँग्रेसला मत द्या असल्याचं म्हटलं होतं. यानंतर हा व्हिडिओ प्रचंड वेगानं व्हायरल झाला होता.