मुंबई -चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा सध्या अडचणीत आहेत. अलीकडेच त्यांना चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना 3 महिन्यांसाठी तुरुंगवासाची शिक्षा आणि अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आलं आहे. राम गोपाल वर्मा यांना मुंबईच्या अंधेरी कोर्टानं तीन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. याप्रकरणी त्यांनी एक पोस्ट करून लिहिलं, 'माझ्या आणि अंधेरी न्यायालयाबद्दलच्या बातम्यांबाबत, मी हे स्पष्ट करू इच्छितो की, हा माझा माजी कर्मचाऱ्याशी संबंधित 2 लाख 38 हजार रुपयांचा 7 वर्षे जुना खटला आहे... माझा वकील हे प्रकरण पाहत आहे. हे प्रकरण न्यायालयात असल्यानं, मी पुढे काहीही बोलू शकत नाही.'
राम गोपाल वर्मा झाली शिक्षा :चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांच्याविरुद्ध न्यायालयानं लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयानं राम गोपाल वर्मा यांना तीन महिन्यांत तक्रारदाराला 3 लाख 72 हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. जर त्यांनी असं केलं नाही तर त्यांना तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होईल. मंगळवारी 21 जानेवारी अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात राम गोपाल वर्माच्या सात वर्षे जुन्या चेक बाउन्स प्रकरणाबद्दल निर्णय दिला. मात्र राम गोपाल वर्मा या खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचले नाहीत. यानंतर परिस्थितीत न्यायालयानं त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केलं. राम गोपाल वर्मा यांना निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायदा कलम 138 अंतर्गत शिक्षा सुनावली आहे.