मुंबई- राजकुमार राव आगामी 'श्रीकांत - आ रहा है सबकी आँखे खोलने' या चित्रपटात उद्योगपती श्रीकांत बोल्लांचा उल्लेखनीय प्रवास उलगडणार आहे. या चित्रपटाचं पूर्वी 'श्री' असं शीर्षक ठरलं होतं. नव्या शीर्षकासह हा चित्रपट अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 10 मे रोजी रिलीज होणार आहे. तुषार हिरानंदानी यांना 'सांड की आंख'च्या दिग्दर्शनासाठी ओळखलं जातं. 'श्रीकांत' या चित्रपटात ज्योतिका, अलाया एफ आणि शरद केळकर यांच्याही भूमिका असणार आहेत.
हा चरित्रात्मक नाट्यमय चित्रपट श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनाचा आढावा घेणार आहे. दृष्टिहीन असूनही, धैर्यानं श्रीकांत बोल्ला यांनी आपल्या आकांक्षांचा पाठपुरावा केला आणि बोलंट इंडस्ट्रीजची यशस्वी स्थापना केली.
शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या आणि अंध असलेल्या श्रीकांत यांनी 2012 मध्ये रतन टाटा यांच्या पाठिंब्यानं आपल्या उद्योजकीय प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी बोलंट इंडस्ट्रीजच्या वतीनं सुपारी आणि रिसायकलिंग होऊ शकेल अशा पर्यावरणास अनुकूल उत्पादने तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले आणि अपंग व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली. कंपनीच्यावतीनं बनवण्यात येणाऱ्या उत्पादनामध्ये रिसायकलिंग केलेले क्राफ्ट पेपर, पॅकेजिंग आयटम, डिस्पोजेबल वस्तू आणि रिसायकलिंग केलेली प्लास्टिक उत्पादने यांचा समावेश आहे.