मुंबई - 'पुष्पा 2: द रूल' चित्रपटाच्या रिलीजचे काऊंट डाऊन सुरू झालंय. येत्या 5 डिसेंबरला हा चित्रपट येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पुष्पा चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांमध्ये नवा जोम निर्माण करण्यासाठी पुष्पा द राइज या पहिल्या चित्रपटाचे री-रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
'पुष्पा' चित्रपटाचा पहिला भाग 'पुष्पा : द राइज' हा हिंदी भाषेतील चित्रपट 22 डिसेंबर रोजी जवळच्या थिएटरमध्ये पाहता येणार असल्याचं गोल्डमाईन्स टेली फिल्म्सनं चाहत्यांना कळवलं आहे.
'पुष्पा' हा चित्रपट हिंदीमध्येही खूप गाजला होता. मूळ तेलुगूमध्ये बनलेला हा चित्रपट दाक्षिणात्य चित्रपटांबरोबरच हिंदी भाषेतही डब करण्यात आला होता. यातील अल्लू अर्जुनच्या व्यक्तीरेखेला श्रेयस तळपदेनं आवाज दिल्यामुळे त्यातील हिंदी डायलॉग अतिशय लोकप्रिय झाले होते. आता 'पुष्पा'च्या दुसऱ्या भागातही असेच डायलॉग श्रेयसच्या आवाजात ऐकायला मिळणार आहेत. हा चित्रपट हिंदी भाषिक राज्यामध्ये पुन्हा एकदा 'पुष्पा'ची नवी लाट तयार करु शकतो. अलीकडेच या चित्रपटाचा ट्रेलर पाटणा शहरात लॉन्च झाल्यामुळे उत्तर भारतासह बिहारमध्ये एक लाट निर्माण झाली होती. विशेष म्हणजे सुमारे दोन लाख चाहत्यांच्या उपस्थितीत पाटण्याच्या गांधी मैदानात हा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला होता. अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी आलेल्या गर्दीत चेंगराचेंगरी होण्याचाही प्रसंग उद्भवला होता.
'पुष्पा 2' चित्रपटाचा पाटणा इव्हेंटने हाईप वाढवला आहे... 'पुष्पा 2 : दरू'ल एक विलक्षण, रेकॉर्डब्रेक सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे... चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्व प्री-रिलीज अंदाज भंग पावतील, असा अंदाज ट्रेड विश्लेषक तरण आदर्श यांनी म्हटलंय. पाटणा ट्रेलर लॉन्च इव्हेंटला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद, ट्रेलरच्या प्रभावासह बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा झुकेगा नही' याचा स्पष्ट पुरावा असल्याचंही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'पुष्पा 2' ची हाईप वाढत असताना पुढील भागाचा प्रवास पुन्हा जिवंत करण्यासाठी सुकुमार दिग्दर्शित, 'पुष्पा: द राइज' पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहता येणार आहे.