मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'पुष्पा 2: द रुल'नं भारतात धमाकेदार कमाई केली आहे. आता या चित्रपटाला रिलीज होऊन 35 दिवस झाले आहेत. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जवळपास अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले आहेत. भारतीय बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2: द रुल'नं 1213 कोटींची कमाई केली आहे. आता देखील नवीन चित्रपट प्रदर्शित होत असतानाही 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. नाना पाटेकरचा 'वनवास' असो किंवा वरुण धवनचा 'बेबी जॉन' या चित्रपटांना जास्त कमाई करण्याची संधी 'पुष्पा 2'नं दिली नाही.
'पुष्पा 2'ची कमाई : चित्रपटगृहात 'पुष्पा 2: द रुल' प्रदर्शित होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे. आता चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घट होताना दिसत आहे. सॅकनिल्कच्या मते, या चित्रपटानं 35व्या दिवशी सर्व भाषांमध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 2.15 कोटींची कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यात या चित्रपटाचं एकूण कलेक्शन अंदाजे 23.25 कोटींवर पोहोचलं आहे. जर हाच ट्रेंड कायम राहिला तर 'पुष्पा 2' या आठवड्याच्या अखेरीस फक्त 25 कोटी रुपये कमवू शकेल, असं चित्रपट तज्ज्ञांचं मत आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात 'पुष्पा 2'नं 264.8 कोटी रुपयांची कमाई केली, तर तिसऱ्या 129.5 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपये कमावले होते. या चित्रपटानं जागतिक ब्लॉकबस्टर म्हणून आपले स्थान पक्के केले आहे.