मुंबई :अभिनेता अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर 'पुष्पा 2'ची कमाई बॉक्स ऑफिसवर मंदावली आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एक महिना पूर्ण केला आहे. आता हा चित्रपट 1206 कोटींचा टप्पा पार करून भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा हिट ठरला आहे. रिलीजच्या 33व्या दिवशी अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं आतापर्यंतची सर्वात कमी कमाई केली आहे. सॅकनिल्कनुसार, 'पुष्पा 2'नं सर्व भाषांमध्ये सोमवारी 6 जानेवारी रोजी 2.5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. पाचव्या आठवड्यात कमाईत घसरण होऊनही, या चित्रपटाचे विक्रम मोडणे सुरूच आहे.
'पुष्पा 2'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन : 'पुष्पा 2'नं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी रुपये आणि दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी रुपये, तिसऱ्या 129.5 कोटी आणि चौथ्या आठवड्यात 69.65 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 33 दिवसांत या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर देशांतर्गत 1208.7 कोटी रुपये कमवले आहेत. 'पुष्पा 2'नं हिंदीमध्ये सर्वाधिक कमाई केली आहे. या चित्रपटानं हिंदी बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन 813.5 कोटीचं केलं आहे. 'पुष्पा 2'नं अवघ्या चार आठवड्यांत जागतिक स्तरावर 1800 कोटींची जबरदस्त कमाई करून 'बाहुबली 2'ला मागे टाकले आहे. 'बाहुबली 2' हा 2016 पासून जगभरात दुसरा सर्वाधिक कमाई करणार चित्रपट होता.