मुंबई : अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा ॲक्शन चित्रपट 'पुष्पा 2 - द रुल' बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड मोडत आहे. याशिवाय या चित्रपटानं हिंदी बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत हा चित्रपट सातत्यानं नवनवे विक्रम करत आहे. मंगळवारी 'पुष्पा 2 - द रुल' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी एक रेकॉर्डब्रेकिंग दिवस पाहायला मिळाला. आता 'पुष्पा 2' जगभरातील बॉक्स ऑफिसवर 900 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप जलद गतीनं कमाई करत आहे. 'पुष्पा 2' हा हिंदीमध्ये पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
'पुष्पा 2 - द रुल'चं धमाकेदार कलेक्शन :'पुष्पा 2'नं त्याच्या पहिल्या मंगळवारी म्हणजेच रिलीजच्या सहाव्या दिवशी हिंदीमध्ये 38 कोटी नेट कलेक्शन केलंय. 6 दिवसात एकूण हिंदीमधील नेट कलेक्शन 370 कोटींहून अधिक झालंय. तसेच शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटाचं नेट कलेक्शन 351 कोटी रुपये आहे. 'पुष्पा 2' हिंदीच नाही तर भारतातील सर्व भाषांमध्ये चांगली कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं मंगळवारी सर्व भाषांमध्ये 52.4 कोटी रुपये कमवले आहेत. 'पुष्पा 2'नं आता रणबीर कपूर स्टारर 'ॲनिमल'ला मागे टाकले आहे. सुकुमार दिग्दर्शित हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत आहे.