मुंबई :'पुष्पा 2: द रुल' बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. दरम्यान चौथ्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झाली आहे. रिलीजच्या 26व्या दिवशी या चित्रपटानं आजपर्यंतचे सर्वात कमी कलेक्शन केलं आहे. मात्र नवीन वर्षात पुन्हा कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. 'पुष्पा 2'नं 25 दिवसांत जगभरात 1750 कोटींचा आकडा पार केला आहे. एका रिपोर्टनुसार हा, चित्रपट जगभरात 1,800 कोटी रुपये सहज कमवू शकतो. बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चित्रपटाच्या कमाईचा वेग मंदावला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार या चित्रपटानं पहिल्या आठवड्यात 725.8 कोटी, दुसऱ्या आठवड्यात 264.8 कोटी आणि तिसऱ्या आठवड्यात 129.5 कोटी कमावले आहेत.
'पुष्पा 2: द रुल'चं कलेक्शन : सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटानं चौथ्या शुक्रवारी 8.75 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. चौथ्या शनिवारी 12.5 कोटी रुपये आणि चौथ्या रविवारी 15.65 कोटी रुपयांची कमाई केली होती. या चित्रपटानं रिलीजच्या 26व्या दिवशी 6.65 कोटीचं कलेक्शन केलं आहे. ही चित्रपटाची आतापर्यंतची सर्वात कमी कमाई आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 26व्या दिवसापर्यंत भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 1163.65 कोटींची कमाई केली आहे. 'पुष्पा 2'च्या हिंदी शोबद्दल बोलायचं झालं तर, निर्मात्यांनुसार हा चित्रपट 26 दिवसांत 775.50 कोटीवर पोहोचला आहे.