मुंबई -बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा पती पॉप स्टार निक जोनासबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. निक एका कॉन्सर्टमध्ये गात होता आणि अचानक त्याला स्टेज सोडून तिथून पळून जावं लागलं. निक जोनास सध्या त्याच्या दोन भावांबरोबर वर्ल्ड टूर कॉन्सर्टवर आहे. तो पॅराग्वेमध्ये एका स्टेजवर परफॉर्म करत होता. यावेळी निकच्या लक्षात आले की, त्याच्यावर लेझरनं निशाना साधला जात आहे, हे पाहून त्यानं आपल्या बॉडीगार्डला इशारा दिला. यानंतर तो स्टेज सोडून गेला. आता निक जोनासचा स्टेजवरून पळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
निकबद्दल चाहत्यांनी केली चिंता व्यक्त : समोर आलेल्या व्हिडिओमध्ये निक कधी प्रेक्षकांकडे, तर कधी वरच्या दिशेनं पाहत असल्याचा दिसत आहे. यानंतर त्याला संशय येतो आणि तो स्टेजवरून पळून जातो. या कॉन्सर्टनंतर त्याच्या चाहत्यांच्या काळजीत वाढ झाली आहे. आता कुठेतरी लोक निक जोनासच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करत आहेत. एका यूजरनं व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'जोनास ब्रदर्सला त्यांचा कॉन्सर्ट थांबवावा लागेल.' दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, 'गर्दीतून कोणीतरी लेझरद्वारे निशाण्यावर घेतलं, निकने काय कोणाचं वाईट केलं आहे?' आणखी एकानं लिहिलं, 'बरं झालं निकला काही झालं नाही.' या पोस्टवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत.