मुंबई - Preity Zinta in Lahore 1947:बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूडपासून दूर असलेली प्रीती झिंटा लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहे. ती बहुप्रतीक्षित सनी देओल स्टारर 'लाहोर 1947' या चित्रपटामध्ये विशेष भूमिकेत दिसणार आहे. खुद्द प्रीतीनं याबद्दलची पुष्टी केली आहे. 23 एप्रिल रोजी हनुमान जयंतीच्या निमित्तानं तिनं तिच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. 'लाहोर 1947' या चित्रपटाच्या सेटवरील काही फोटो तिनं शेअर केले. चित्रपटाच्या क्लॅपर बोर्डचा फोटो पोस्ट करत तिनं लिहिलं, 'लाहोर 1947 च्या सेटवर...' याशिवाय तिनं दिग्दर्शक राजकुमार संतोषीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे.
प्रीती झिंटा करणार पुनरागमन :प्रीती झिंटा आणि सनी देओल एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी 'हीरो: लव्ह स्टोरी ऑफ अ स्पाय', 'फर्ज' आणि 'भैय्याजी सुपरहिट' अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दरम्यान ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रीतीच्या पोस्टवर अनेकजण कमेंट्स करत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं लिहिलं, "प्रीती परत आली, याबद्दल आता मला आनंद होत आहे." दुसऱ्या एकानं लिहिलं, "क्वीन इज बॅक इन बॉलिवूड" आणखी एकानं लिहिलं, "गदर 2 चित्रपटासारखा 'लाहोर 1947' हा देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरणार आहे." याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत.