मुंबई - New serial Bhumikanya : श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांनी 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेतून निर्माते म्हणून पदार्पण केलं. या मालिकेला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. आता ते त्यांच्या 'ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स' या बॅनरखाली 'भूमिकन्या - साद घालते निसर्गराजा' ही एक नवीन मालिका घेऊन येत आहेत. मनोरंजनाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या या मालिकेत प्रेक्षकांना वेगळा विषय पाहायला मिळणार आहे. आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक कन्या आज अभिमानाचा विषय ठरल्या आहेत. तशीच 'भूमिकन्या' ही धरतीची कन्या असून शेतकरी कुटुंबातील एका महत्वपूर्ण विषयावर ही मालिका आहे.
शेतकरी हा आपल्या देशाचा अन्नदाता आहे, पण त्याचे जीवन अनेक समस्यांनी भरलेलं आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 'भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा' या मालिकेत अशाच एका संघर्षशील शेतकऱ्याच्या कुटुंबातील लढाऊ कन्येची कथा आहे. जगभरातील लोकांसाठी अन्नदाता असलेल्या बळीराजावर आधारित ही मालिका आहे. बळीराम हा सामान्य शेतकरी असून, त्याच्या आयुष्यातील संघर्षाची कथा या मालिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. काहीजण कठीण परिस्थितीत हार मानतात, तर काही जिद्दीनं त्यावर मात करतात. अशाच एका संघर्षमय जीवनाची कथा या मालिकेत उलगडणार आहे. लक्ष्मी ही या मालिकेची नायिका आहे, जी कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधत आपल्या वडिलांच्या पाठीशी उभी राहते.
'भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा' मालिकेत अनुष्का बोऱ्हाडे, आनंद अलकुंटे आणि गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. अवधूत पुरोहित यांनी या मालिकेचे दिग्दर्शन केलं आहे. 'जमीन कसून तिचा मान राखणारी... एका राजाची जशी राजकन्या, तशी माझी भूमिकन्या' या कथानकाची ही नवी मालिका १० जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येईल.