मुंबई - Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या 'हाय नन्ना' या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. हा चित्रपट डिसेंबरमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं दमदार कलेक्शन बॉक्स ऑफिसवर केलं होतं. जानेवारीच्या सुरुवातीला ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर, मृणालचा तेलुगू चित्रपट अनेकांना पसंत पडला आहे. 'हाय नन्ना' या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनचीही चांगलीच चर्चा होत आहे. दरम्यान या चित्रपटामध्ये मृणालनं साऊथ अभिनेता नानीसोबत काम केलं होतं. साऊथमध्ये दोन उत्कृष्ट रोमँटिक प्रेमकहाणी केल्यानंतरही मृणालला हिंदीत रोमँटिक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत नाहीत.
मृणाल ठाकूरला हिंदीत रोमँटिक चित्रपट नाही :'सीता रामम' नंतर लोक मृणालला 'क्वीन ऑफ रोमान्स' म्हणू लागले, मात्र तिला हिंदीत रोमँटिक चित्रपट मिळविण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत आहे. एका मुलाखतीदरम्यान तिनं याबद्दल टोमणा मारला आणि म्हटलं, ''मला माहीत नाही, कदाचित मी अद्याप प्रेमकहाणीत घेण्याइतकी लोकप्रिय नाही. माझी चूक आहे का? एखाद्या प्रेमकहाणीचा चित्रपट मिळवण्यासाठी मला लोकप्रिय व्हायलाच हवं ना?'' मृणाल पुढं म्हणते, ''मला अनेक हिंदी चित्रपटांच्या ऑफर येत आहेत, पण त्या रोमँटिक कहाणी नाहीत. मी चित्रपट निर्मात्यांसमोर स्वत:ला सिद्ध करून थकले आहे.''