मुंबई - बिग बजेट 'पुष्पा २ : द रुल' हा चित्रपट आज प्रदर्शित झालाय. या सिनेमाला तुफान प्रतिसाद मिळत असताना या सिनेमासाठी मात्र मराठी सिनेमाला थिएटर्स मालकांनी दूर लोटलंय. या सिनेमामुळे मराठी सिनेमा 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या सिनेमाचे शो अनेक ठिकाणी रद्द करण्यात आलेत, तर काही ठिकाणी कमी करण्यात आलेत. बिग बजेट हाऊसफुल्ल चालणाऱ्या हिंदी सिनेमांसाठी मराठी सिनेमांचं पॅकअप करणे हे यापूर्वीही झाले असून, त्याचा फटका मराठी चित्रपटांच्या निर्मात्यांना बसत आहे.
पुष्पा 2 सिनेमामुळे मराठी चित्रपटाला थिएटर्समध्ये स्क्रीन नाही : अनुप सिंग ठाकूर आणि अभिनेत्री अमृता खानविलकर यांची प्रमुख भूमिका असलेला 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' हा सिनेमा २२ नोव्हेंबरला प्रदर्शित झालाय. दुसऱ्या आठवड्यापासून या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असताना आता सिनेमाच्या निर्मात्यांना पुष्पा २ चित्रपटामुळे नवीन अडचणीला सामोरं जावं लागत आहे. सुरुवातीला धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाला प्रेक्षकांकडून तितकी पसंती मिळाली नाही. परंतु आता या सिनेमाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असताना पुष्पा 2 या सिनेमामुळे मराठी चित्रपटाला थिएटर्समध्ये स्क्रीन मिळत नाहीत.
आम्ही धडा शिकवू पण, तक्रार नाही :या विषयावर बोलताना महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर म्हणाले की, ही बाब खरी आहे की, जेव्हा जेव्हा बिग बजेट हिंदी चित्रपट येतात, तेव्हा त्यांच्या प्राईम टाईमसाठी मराठी चित्रपटावर अन्याय होतो. यापूर्वीसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने या विषयावर अनेकदा आंदोलन छेडून मराठी चित्रपटांना योग्य तो न्याय मिळवून दिला आहे. पुष्पा 2 या चित्रपटामुळे जर का, 'धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज' या चित्रपटाला थिएटर मिळत नसेल, त्यावर अन्याय होत असेल तर तशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे प्राप्त झाल्यावर आम्ही त्यावर योग्य तो निर्णय घेऊ. परंतु अद्याप अशी कुठलीही तक्रार आमच्याकडे आली नसल्याने आम्ही त्यावर भाष्य करणे उचित नसल्याचंही त्यांनी सांगितलं.