मुंबई - चित्रपट बनताना कथानकाबरोबरच त्याच्या शिर्षकावरही सांगोपांग चर्चा केली जाते. प्रत्येक निर्माता-दिग्दर्शकाचा प्रयत्न असतो की चित्रपटाचे शीर्षक आकर्षक असावं जेणेकरून ते प्रेक्षकांना आवडेल आणि ते तो सिनेमा बघण्याचं ठरवतील. सिनेमांची शिर्षकं अनोखी ठेवण्याचा प्रयत्न सर्वच करतात. आता हेच बघाना, दिग्दर्शक स्वरूप सावंत यांचा एक नवीन चित्रपट येऊ घातलाय, ज्याचं नाव आहे ‘म्हणजे वाघाचे पंजे’. हे एक अत्यंत अद्वितीय नाव असून, बोली भाषेतील म्हणीचा टायटल म्हणून उपयोग करण्यात आला आहे.
अर्थात, 'म्हणजे वाघाचे पंजे’ या नावावरून तो विनोदी सिनेमा असणार हे कळून चुकतं. त्यातच यातील कलाकाराची फळी बघितल्यास त्यावर शिक्कामोर्तब होतो. आघाडीचे अभिनेता सौरभ गोखले, निखिल चव्हाण, संजय नार्वेकर, चिन्मय उदगीरकर, मेघराज भोसले, दिपाली सय्यद, प्राजक्ता हनमगार, अनिल नगरकर, घनश्याम दोरोडे आणि सिद्धेश्वर झाडबुके हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीला एक सुस्वरूप आणि नव्या दमाची हिरॉईन मिळणार आहे. नवतारका तमन्ना बांदेकर या सिनेमाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे.
‘म्हणजे वाघाचे पंजे ('Mhanje Waghache Panje' teaser)
या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वरूप सावंत यांनी केलं असून, संकलनाचंही दायित्व त्यांनीच पार पाडलं आहे. लेखक म्हणून संजय नवगिरे यांनी कथा आणि पटकथेला आकार दिला आहे, तर संगीतकार हर्षवर्धन वावरे आणि त्रिनीती ब्रोस यांनी सिनेमा अधिक रंगतदार करण्याची जबाबदारी उचलली आहे. या चित्रपटाचं छायाचित्रण वीरधवल पाटील यांनी केलं असून, त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झालेली दृश्यं नक्कीच मनाला भावतील अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली. चित्रपटाच्या कथेबद्दल फारशी माहिती उघड करण्यात आलेली नसली, तरी त्यांच्या मते यात एक वेगळा संदेश दडलेला आहे, जो प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडेल.
‘म्हणजे वाघाचे पंजे ('Mhanje Waghache Panje' poster)
दिग्दर्शक म्हणाले की, "‘म्हणजे वाघाचे पंजे’ हा चित्रपट एक आगळावेगळा अनुभव देण्यासाठी सज्ज झाला आहे. रोमँटिक कथानकाबरोबरच अनपेक्षित वळणं आणि आशयघन मांडणी असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवेल." त्रिशुलीन सिनेव्हिजन प्रस्तुत आणि स्वरूप सावंत दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर आणि प्रदर्शनाची अधिकृत तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
हेही वाचा -