मुंबई - Manisha Koirala : अलीकडेच ब्रिटनचे भारतीय वंशाचे पंतप्रधान ऋषि सुनक हे ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांच्यापेक्षाही श्रीमंत झाल्याची बातमी समोर आली होती. सध्या सोशल मीडियावर याबाबत खूप चर्चा होताना दिसत आहे. दरम्यान बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री मनीषा कोईरालानं ब्रिटनमधील 10 डाऊनिंग स्ट्रीट येथील निवासस्थानी पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट घेतली. मनीषानं या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मनीषा कोईराल ही एकमेव नेपाळी अभिनेत्री आहे जी आजही बॉलिवूडमध्ये काम करत आहे. ब्रिटन आणि नेपाळमधील मैत्री कराराला 100 वर्षे पूर्ण होत असताना मनीषा प्रतिनिधी म्हणून ब्रिटनला पोहोचली होती. विशेष म्हणजे या प्रसंगी मनीषाची प्रमुख भूमिका असलेल्या 'हीरामंडी' या वेब सीरीजमधल्या तिच्या अभिनयाचं थेट ब्रिटनच्या पंतप्रधान आवासातील स्टाफनं कौतुक केलं.
मनीषा कोईरालानं घेतली पंतप्रधान सुनकची भेट :मनीषानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पीएम सुनकबरोबर उभी असून हसताना दिसत आहे. तिनं शेअर केलेल्या फोटोंवर अनेकजण कमेंट्समार्फत तिचं कौतुक करताना दिसत आहेत. मनीषानं पोस्टवर शेअर करत लिहिलं, 'यूके आणि नेपाळ यांच्यातील मैत्री कराराला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मला पंतप्रधान निवासस्थानी आमंत्रित केल्यानं खूप आनंद झाला.' मनीषा कोईराला नेपाळी राजकारणी प्रकाश कोईराला यांची मुलगी असून तिचे आजोबा बिश्वेश्वर प्रसाद कोईराला हे नेपाळचे पंतप्रधान (1959-1960) होते. दरम्यान मनीषा कोईराला नुकतीच 'हीरामंडी' वेब सीरीजमध्ये दिसली होती. ब्रिटनच्या पंतप्रधान निवासातील कर्मचारी, अधिकाऱ्यांनी मनीषा कोईरालाची सध्या गाजत असलेली 'हीरामंडी' वेब सीरीज पाहिल्याचं आणि त्यांना ती आवडल्याचं आवर्जून सांगितलं.