मुंबई : गेल्या वर्षी अक्षय कुमारनं 'स्त्री 2' चित्रपटामध्ये कॅमिओ केला होता. या चित्रपटामधील त्याचा कॅमिओ खूप गाजला होता. 2024 मध्ये 'खेल खेल में' आणि 'सरफिरा'सारखे चित्रपट त्याचे फ्लॉप ठरले. मात्र 'स्त्री 2' हा बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. आता अलीकडेच मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सच्या 8 चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये 'स्त्री 3' देखील समाविष्ट आहे. तेव्हापासून या चित्रपटात अक्षय कुमार दिसणार की, नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. आता निर्मात्यांनी याबद्दल पुष्टी केली आहे की अक्षय 'स्त्री 3'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल.
निर्मात्यांनी पुष्टी केली :'स्काय फोर्स'च्या ट्रेलर लॉन्चवेळी, अक्षयला विचारण्यात आलं की तो मॅडोक हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग असेल का? यावर अक्षय म्हटलं होतं, 'मी काय सांगू, दिनेश आणि ज्योती यांना हे ठरवावे लागेल, ते पैसे गुंतवतील आणि अमर कौशिक यांना दिग्दर्शन करायचे आहे.' अक्षयच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना दिनेश विजन म्हटलं, 'नक्कीच ते मॅडोक हॉरर-कॉमेडी विश्वाचा एक भाग आहे. ते आमच्यासाठी थानोस आहेत.' 'स्त्री 2'मधील अक्षयची भूमिका प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. 'स्त्री 2'मध्ये अक्षय कुमारला सरकटेच्या घराण्यातील शेवटचा जिवंत सदस्य म्हणून दाखवण्यात आलं होतं. आता 'स्त्री 3'मध्ये अक्षयच्या उपस्थितीनं प्रेक्षक खूप खूश होणार आहेत.