मुंबई - किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज'ला ऑस्कर पुरस्कारासाठी एन्ट्री मिळाली आहे. अभिनेता आणि भाजप खासदार रवी किशन यांनीही यात दमदार भूमिका बजावली होती. यात रवी किशनने इन्स्पेक्टरची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. या चित्रपटाची ऑस्कर पुरस्कारासाठी भारताच्यावतीनं निवड झाल्याची बातमी कळली तेव्हा रवी किशन यांनी प्रचंड आनंद व्यक्त केला. या चित्रपटात पुरुषप्रधान वातावरणातील भारतीय महिलांच्या परिस्थितीचे सुंदर वर्णन करण्यात आले आहे. आपल्या व्यक्तिरेखेबद्दल त्यांनी सांगितले की, ही भूमिका साकारताना त्याच्या मनात बिहारमधील सब-इन्स्पेक्टरची प्रतिमा होती. तो नेमका असाच बोलायचा. रवी किशन यांनीही चित्रपटाशी संबंधित त्यांचे अनुभव सांगितले.
आमिर खान साकारणार होता इन्स्पेक्टरची भूमिका :
रवी किशन म्हणाले की, भारतातून 124 चित्रपटांनी ऑस्कर पुरस्कारासाठी अर्ज सादर केला होता ही आनंदाची बाब आहे, परंतु केवळ 5 कोटी रुपयांचे बजेट असलेला हा चित्रपट यशस्वी झाला आहे. त्याबद्दल त्यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शिका किरण राव आणि निर्माता आमिर खान यांचे आभार मानले आहेत. मी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती जी आमिर खान साकारणार होता, ज्याची खूप चर्चा झाली होती, असंही त्यांनी सांगितलं.
चित्रपट जिंकेल ऑस्कर पुरस्कार :
भोजपुरी समाजासाठीही हा मोठा दिवस असल्याचं त्यांनी सांगितले. या समाजातील लोकांच्या बोलीभाषेतील चित्रपटाला ऑस्करसारख्या पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ऑस्करमध्ये एंट्री मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे, पण आपल्या चित्रपटाला महादेवाचा आशीर्वाद मिळेल, अशी पूर्ण आशा असल्याचे त्यांनी सांगितले. हा चित्रपट ऑस्कर पुरस्कार जिंकण्यातही यशस्वी ठरणार आहे, असे ते म्हणाले.