मुंबई - Margaon Express : दिव्येंदू, प्रतीक गांधी आणि अविनाश तिवारी मुख्य भूमिका साकारत असलेल्या 'मडगाव एक्सप्रेस' चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल खेमू करत आहे. या चित्रपटाचं शूटिंग गोव्याच्या अस्सल लोकेशन्सवर पार पडलंय. या चित्रपटासाठी मुंबईत आणि फिल्म सिटी किंवा इतरत्र कोठेही सेट उभारता आला असता. पण याचं शूटिंग त्यानं गोव्यातच करण्याचा निर्णय घेतला. याबद्दलच्या कारणांचा खुलासा कुणालनं केला आहे.
अलीकडेच कुणालने 'मडगाव एक्स्प्रेस' चित्रपटाच्या ट्रेलरचे लॉन्चिंग केले. ही तीन तरुण मुलांची हास्यकथा आहे. या तिघांनाही लहानपणापासून गोव्यात फिरायला जायचंय. तिथं जाऊन कशी धमाल मस्ती करायची याची त्यांनी स्वप्न पाहिलेत. पण वेगवेगळ्या कारणांनी त्यांचं हे स्वप्न लांबणीवर पडलंय. पण अखेर ते घराबाहेर पडतात आणि गोव्याला जाण्यासाठी 'मडगाव एक्स्प्रेस' पकडतात. त्यांचं स्वप्न सत्यात उतरत असताना त्याचं रुपांतर एका दुःस्वप्नात होतं. याची धमाल कथा कुणाल खेमूनं प्रेक्षकांसाठी तयार केली आहे. या चित्रपटात नोरा फतेही, उपेंद्र लिमये आणि छाया कदम हे देखील कॉमेडी ड्रामाचा एक भाग आहेत.
गोव्यातील शूटिंगच्या अनुभवाविषयी बोलताना कुणाल खेमू म्हणाला, "मला गोवा आवडतो, मी वेगवेगळ्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनेकवेळा गोव्याला गेलो आहे आणि ते माझ्यासाठी सर्वात हृदयाच्या जवळचे ठिकाण आहे. गोवा म्हटल्यावर देशातील प्रत्येकाला माहित आहे की हे सर्व मजेशीर आहे, एक प्रकारचा उत्साह, सुंदर समुद्रकिनारे आणि त्याची ऐकू येणारी गाज. या चित्रपटात मी मुंबईत राहणाऱ्या तीन मुलांची गोष्ट सांगत आहे. त्यांना लहानपणापासून गोव्याला जायचंय पण गेली 20 वर्षे हे स्वप्न त्यांना हुलकावणी देतंय."