मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ शेवटची 'मेरी ख्रिसमस'मध्ये अखेरची दिसली होती. हा चित्रपट यावर्षी १२ जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यात कॅटरिना आणि विजय सेतुपती यांच्या अभिनयाची कमाल पाहायला मिळाली होती. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही. आता कॅटरिना कैफच्या नवीन प्रोजेक्टबाबत चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आली आहे. विशेष म्हणजे यावेळी ही अभिनेत्री कॅटरिना दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.
कॅटरिना कैफच्या आगामी प्रोजेक्टचा टीझर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या टीझरमध्ये पॉवरफुल व्हीएफएक्सचा वापर करण्यात आल्याचं दिसत आहे. व्हायरल व्हिडिओ एका बर्फाळ ठिकाणापासून सुरू होतो, ज्यात कॅटरिना फास्ट एअर बाइक चालवताना दिसत आहे. यादरम्यान तिच्यावर गोळीबार करत असलेल्या काही ड्रोनचीही झलक दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ कॅटरिना कैफनं दिग्दर्शित केला असल्याचा उल्लेख व्हाईस ओव्हर आणि टेक्स्टच्या माध्यमातून झाला आहे.
कतरिनाच्या व्हायरल व्हिडिओवर यूजर्सची प्रतिक्रिया - काही सोशल मीडिया यूजर्स या व्हिडिओला Xiaomi ची जाहिरात असल्याचं म्हणत आहेत. एका एक्स युजरनं हा व्हिडिओ शेअर केला आणि कॅटरिना तिच्या आगामी झीओमीच्या जाहिरातीत नव्या अवतारात असल्याचं म्हटलंय. तिच्या या नव्या वाटचालीबद्दल अनेकांनी तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.
या व्हायरल व्हिडीओची संपूर्ण झलक कधी प्रसिद्ध होणार आणि त्याचे नाव काय याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिसत नाही. कॅटरिनानं गेल्या काही महिन्यापासून तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल कोणतीही स्पष्टता दिलेली नाही. आतापर्यंत आपल्या अभिनयानं सर्वांची मनं जिंकणारी कॅटरिना तिच्या दिग्दर्शनाच्या पदार्पणाच्या प्रोजेक्टनं कितपत खळबळ निर्माण करते हे पाहावं लागणार आहे.
कॅटरिना आणि विकी कौशल यांच्या सुखी संसाराला डिसेंबरच्या 9 तारखेला 3 वर्षे पूर्ण होतील. अतिशय संयमी आणि आनंदी जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातंय. अधून मधून ती पतीबरोबर सुट्टीचा आनंद घेताना दिसत असली तरी तिच्या आगामी चित्रपटाची उत्कंठा प्रेक्षकांना लागून राहिली आहे.