मुंबई - Kangana Ranaut :बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनच्या घरी गेल्या शनिवारी किरकोळ पार्किंगच्या मुद्द्यावरून झालेल्या भांडणावर अभिनेत्रीनं कंगना रणौतनं आता प्रतिक्रिया दिली आहे. रवीना टंडनवर एक ज्येष्ठ नागरिक आणि तीन महिलांबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोप केला गेला होता. पोलीस तपासात या प्रकरणात रवीना दोषी आढळली नाही. दरम्यान कंगना रणौतनंही या मुद्द्यावर एक पोस्ट शेअर केली आहे. कंगना रणौतनं तिच्या इन्स्टास्टोरीवर या प्रकरणावर एक पोस्ट शेअर करत लिहिलं, "रवीना टंडनबरोबरजे घडले ते धक्कादायक आहे, तिला 5 ते 6 लोकांनी घेरलं होतं. आम्ही या प्रकरणाचा निषेध करतो. अशा लोकांना फटकारले पाहिजे, अशा हिंसक कृत्यांमध्ये भाग घेऊ नये आणि गैरवर्तन टाळले पाहिजे."
कंगना रणौतनं दिला रवीना टंडनला पाठिंबा : गेल्या शनिवारी कार पार्किंगवरून रवीना टंडनच्या घराबाहेर किरकोळ भांडण झालं होतं. यामध्ये काही लोकांनी रवीना टंडनला धक्काबुक्की केली आणि तिच्या ड्रायव्हरबरोबर बाचाबाचीही केली. याप्रकरणी दोन्ही पक्षांनी तक्रार देण्यास नकार दिला असून पोलिसांच्या म्हणण्यानुसार या हल्ल्यात कुणालाही इजा झालेली नाही. मात्र रवीना टंडनबरोबर घडलेली ही घटना सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यानंतर अनेकांना रवीनाला पाठिंबा दिला होता.