मुंबई - Kangana Ranaut :अभिनेत्री कंगना राणौत सध्या तिच्या वादग्रस्त चित्रपट 'इमर्जन्सी'मुळे चर्चेत आहे. 'इमर्जन्सी' हा चित्रपट 5 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र शीख समुदायाच्या विरोधामुळे 'इमर्जन्सी' अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. सेन्सॉर बोर्डानं कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'ला हिरवा झेंडा दाखवला नाही. आता तिनं पुन्हा एकदा एका मुलाखतीत याबद्दलचं विधान केलं आहे. नुकतीच एका मुलाखतीत कंगनानं ओटीटीवर येणाऱ्या काही कंटेंटवर प्रश्न उपस्थित केले असून सेन्सॉरशिपची मागणी केली आहे. तिनं सेन्सॉर बोर्डाला 'यूजलेस' असल्याचं म्हटलं आहे.
कंगना राणौतनं साधला सेन्सॉर बोर्डावर निशाणा :ओटीटी कंटेंटही सेन्सॉर बोर्डाच्या कक्षेत यायला हवे, अशी देखील तिनं मागणी केली आहे. कंगनानं म्हटलं की, 'आजकाल मुले यूट्यूबचा खूप वापर करत आहेत, जे खूपच चिंताजनक आहे. ओटीटीवर येणारा कंटेंट मुलांसाठी धोकादायक आहे. ओटीटीसाठी लोक पैसे देतात आणि काहीही पाहातात, हे चुकीचं आहे.' ओटीटी कंटेंटला सेन्सॉर बोर्डाची सर्वाधिक गरज असल्याचं कंगनानं म्हटलं आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटात शीख समुदायाला दहशतवादी दाखवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 14 ऑगस्ट रोजी 'इमर्जन्सी'चा ट्रेलर रिलीज झाला होता. यामध्ये इंदिरा गांधींच्या हत्येचं दृश्य पाहून शीख समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.