महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'किंग खान'चा व्हिडिओ : बर्थडे पार्टीनंतर शाहरुख खानचा चाहत्यांसमोरच जयंत पाटलांनी केला होता पाणउतारा - SHAHRUKH KHAN BIRTHDAY

Shahrukh Khan birthday : शाहरुख खानच्या वाढदिवसाला त्याचे हजारो चाहते कौतुकानं त्याच्या घराबाहेबर जमतात. पण एकदा चाहत्यांच्या साक्षीनंच किंग खानला भाई जयंत पाटलांनी झापलं होतं.

Shahrukh Khan
शाहरुख खान (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Nov 2, 2024, 7:02 AM IST

Updated : Nov 2, 2024, 10:49 AM IST

मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा 59 वा वाढदिवस अतिशय धूमधडाक्यात साजरा होतोय. त्याच्या सजलेल्या 'मन्नत' बंगल्याच्या बाहेर त्याचे हजारो चाहते गेल्या काही दिवसापासून रात्री उशीरापर्यंत गर्दी करत आहेत. या चाहत्यामध्ये दूर शहरातून मुंबईत आलेल्या अनेकांचा समावेश आहे. घराबाहेर जमलेला चाहत्यांचा जनसागर, त्यांना अभिवादन करताना 'किंग खान'ची आयकॉनिक 'सिग्नेचर पोज', चाहत्यांच्या मधून त्याच्या नावाची होणारी गर्जना याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर दिसतील. पण शाहरुख खानला कधीही लक्षात राहू नये असा वाटणारा एक व्हिडिओ चाहते अद्यापही विसरलेले नाहीत. अलिबागचे माजी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी त्याच्या चाहत्यांच्या उपस्थितीत शाहरुखचा पाणउतारा केला होता.

ही गोष्ट आहे 2017 ची. शाहरुख खानचा अलिबागमध्ये एक मोठा बंगला आहे. याठिकाणी तो आपल्या मित्र परिवासारसह अधूनमधून येत असतो. या आलिशान बंगल्यामध्ये तो आपले अत्यंत आनंदाचे क्षण घालवतो. त्यानुसार 2017 मध्ये त्यानं बर्थ डे सेलेब्रिशनसाठी याच बंगल्याची निवड केली होती. दोन दिवस इथं एन्जॉय केल्यानंतर तो मुंबईला कॅटमरननं (फेरीबोट) परतला. मुंबईतील कुलाबाच्या धक्क्यावर त्याची बोट लागली आणि हजारोच्या जनसमुदायानं आपले मोबाईल कॅमेरे त्याची छबी कैद करण्यासाठी सज्ज केले. पण हा भाऊ काही बोटीतून उतरेना. त्याची कॅटमरन बोट धक्क्यावर तशीच उभी होती. दरम्यान, त्याचवेळी अलिबागचे आमदार असलेले भाई जयंत पाटील अलिबागला जाण्यासाठी तिथं पोहोचले होते. शाहरुखची बोट असल्यामुळं त्यांची बोट धक्क्यावर लागत नव्हती. त्यात तिथंपर्यंत पोहोचायला गर्दीमुळं त्यांना जागाही मिळत नव्हती. त्यामुळं जयंत पाटील चिडले होते.

बऱ्याच वेळानंतर जयंत पाटील यांच्या बोटीला जागा मिळाली आणि जयंत पाटील त्यांच्या बोटीत चढले. भडकलेल्या पाटील यांनी त्याच्या बोटीत बसलेल्या शाहरुख खानला चाहत्यांसमोरच झापायला सुरूवात केली. ‘अरे काय चाललंय काय? हा धक्का काय तुझ्या मालकीचा आहे का? अलिबाग, मांडवाला जाणाऱ्यांनी कसं जायचं? हा धक्का सार्वजनिक आहे, ही काही पिक्चरच्या शूटिंगची जागा नाही,’ असं म्हणत जयंत पाटील शाहरुखच्या जवळ जाऊन मोठ्या आवाजात बोलू लागले. गेटवर गर्दी करून थांबलेले हजारो चाहते शाहरुखला कोणीतरी इतक्या वाईट पद्धतीनं झापताना पहिल्यांदाच पाहात होते. हा व्हिडिओ तेव्हापासून व्हायरल झाला आहे.

Last Updated : Nov 2, 2024, 10:49 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details