मुंबई - 'पुष्पा 2: द रुल' हा अल्लू अर्जुन स्टारर सिनेमा जगाच्या बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. 'पुष्पा 2' नं बॉक्स ऑफिसवर 294 कोटी रुपयांसह खातं उघडलं असून अल्लू अर्जुनच्या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाच्या झंझावातामध्ये एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर टिकलेला नाही. 'पुष्पा 2' प्रचंड नफा कमवत आहे आणि त्याचवेळी, कमाईचे नवीन रेकॉर्ड बनवत आहे. हा चित्रपट उभा करत असलेली आव्हानं पार करायला इतर चित्रपटाच्या निर्मात्यांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. दरम्यान, 'पुष्पा 2' हा चित्रपटही वादात अडकल्याचं दिसत आहे. अशा परिस्थितीत 'पुष्पा 2' ला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. मात्र बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 'पुष्पा 2' च्या बचावासाठी पुढं आली आहे.
काय आहे प्रकरण?
असं म्हटलं जातंय की, 'पुष्पा 2' नं देशातील सर्व आयमॅक्स स्क्रीन काबीज केल्या आहेत. त्यामुळे ऑस्कर विजेते दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या 'इंटरस्टेलर' या चित्रपटाचं पुन्हा प्रदर्शन पुढे ढकलावं लागलं. यामुळे हॉलिवूड चित्रपटांची आवड असलेल्या भारतीय प्रेक्षकांची मनं दुखावली गेलेत. कारण भारतात दिग्दर्शक क्रिस्टोफर 'ओपेनहायमर'च्या चित्रपटांची मोठी क्रेझ आहे. त्यामुळे 'इंटरस्टेलर'चे पुन्हा रिलीज पुढं ढकलल्याबद्दल अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं 'पुष्पा २' या चित्रपटाचा बचाव केला आहे. यासंदर्भात अभिनेत्रीनं एक पोस्ट शेअर केली आहे.
'पुष्पा 2' च्या समर्थनासाठी उतरली जान्हवी कपूर
'पुष्पा 2' मुळे 'इंटरस्टेलर' भारतात पुन्हा रिलीज होऊ शकला नाही. यावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर जान्हवीनं लिहिलं आहे की, 'पुष्पा 2' हा देखील एक मास सिनेमा आहे. आपण आपल्या देशातील चित्रपटांना छोटे समजू नये, पाश्चिमात्य चित्रपटांना मोठे समजू नये. या चित्रपटानं भारतीय चित्रपटांचा झेंडा फडकवला आहे. पण आपणच आपले चित्रपट नाकारत आहोत. आता काहीजण या पोस्टवर जान्हवीचं समर्थन करत आहेत तर अनेकांनी 'पुष्पा 2' सह अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे.