हैदराबाद: आयकर विभागानं 'पुष्पा २' चित्रपटाचं प्रॉडक्शन बॅनर असलेल्या मैथ्री मूव्ही मेकर्स आणि 'गेम चेंजर'चे निर्माते दिल राजू यांच्या घर आणि कार्यालयासह ८ ठिकाणी छापे टाकले आहेत. मंगळवारी सकाळी आयकर अधिकाऱ्यांनी गेम चेंजरचे निर्माते आणि तेलंगणा फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (TFDC) चे अध्यक्ष दिल राजू यांच्या कार्यालयावर आणि घरावर तसेच 'पुष्पा' चित्रपटाच्या फ्रँचायझीमागे असलेल्या मैथ्री मूव्ही मेकर्सच्या प्रॉडक्शन बॅनरवर छापा टाकला आहे.
छापा टाकण्यामागचं कारण : दोन्ही चित्रपटांमध्ये गुंतलेले पैसे आणि आयटी रिटर्न याच्यामध्ये मोठी तफावत आढळल्यामुळे आयटी अधिकारी प्राथमिक माहितीच्या आधारे शोध घेत आहेत. याअंतर्गत, आयटीने दिल राजू आणि मैथ्री मूव्ही मेकर्सचे प्रमुख नवीन येरनेनी आणि यालामंचिली रविशंकर यांच्याशी संबंधित ८ हून अधिक ठिकाणांचा शोध घेण्यासाठी ५५ हून अधिक पथके तयार केली आहेत.
निर्माता दिल राजू यांच्या नातेवाईकांच्या घरीही झाडाझडती - प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी दिल राजू, नवीन येरनेनी आणि रविशंकर आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ज्युबिली हिल्स आणि बंजारा हिल्समधील निवासस्थानांची झडती घेतली. या शोध मोहिमेमुळे दिल राजूचा भाऊ शिरीष, मुलगी हंसिता रेड्डी आणि इतर नातेवाईकही संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. दिल राजू यांचा केवळ फिल्म व्यवसायातच नाही तर रिअल इस्टेटमध्येही गुंतलेला आहे आणि तपासादरम्यान अधिकारी प्रत्येक व्यवहाराची चौकशी करत आहेत.
'पुष्पा २' ची कमाई आणि आयकर परतावा- नवीन येरनेनी आणि यलमंचिली रविशंकर यांच्या नेतृत्वाखालील मैथ्री मूव्ही मेकर्सबद्दल बोलायचे झालं तर, या प्रॉडक्शन बॅनरनं अलीकडेच अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा २: द रुल' या २०२५ मधील सर्वात मोठा हिट चित्रपट दिला आहे. ४००-५०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटानं जगभरात १८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली. अधिकाऱ्यांनी मिळवलेला नफा आणि भरलेला आयकर यात मोठी तफावत आढळून आली, आता यासंबंधीची चौकशी सुरू आहे. परंतु, या शोधमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.