मुंबई - इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडिया (IFFI) 2024 चा समारोप समारंभ गुरुवारी 28 तारखेला पार पडला. गेल्या नऊ दिवसापासून सुरू झालेला हा चित्रपटांचा उत्सव गोव्यात समाप्त झाला. या भव्य फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ईफ्फी ( IFFI ) 2024 च्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये अभिनेता विक्रांत मॅसीला मोठ्या गौरवासह सन्मानित करण्यात आलं.
सौल ब्ल्यूवेट दिग्दर्शित लिथुआनियन चित्रपट 'टॉक्सिक' ने भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) गोल्डन पीकॉक पुरस्कार जिंकला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (महिला) पुरस्कार 'टॉक्सिक' मधील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी वेस्टा मातुलाईट आणि लेवा रुपीकाईत यांनी संयुक्तपणे जिंकला आहे. हा चित्रपट मॉडेलिंग स्कूलमध्ये जाणाऱ्या दोन 13 वर्षांच्या मुलींच्या कथेवर आधारित आहे.
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'लंपन' या मालिकेनं भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट वेब सिरीज (OTT) चे विजेतेपद पटकावले आहे. प्रकाश संत यांच्या मूळ कथेवर आधारित ही लंपन ही हृदयस्पर्शी कथा प्रेक्षकांच्या खूपच जवळची बनली आहे.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते फिलिप नॉयस यांना भारताच्या 55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 मध्ये प्रतिष्ठित ईफ्फी (IFFI ) सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यांच्या असाधारण योगदानासाठी, विचार करायला लावणारे कथाकथन आणि जागतिक चित्रपटसृष्टीवर त्यांचा कायमचा प्रभाव यासाठी हा सन्मान देण्यात आला आहे.
55 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) फ्रेंच दिग्दर्शक लुईस कुरवॉइसियर यांना 'होली काऊ' चित्रपटासाठी विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'होली काऊ' या फ्रेंच चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी क्लेमेंट फेव्यू यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा (पुरुष) पुरस्कार देण्यात आला. त्याचबरोबर सारा फ्रीडलँड लिखित आणि दिग्दर्शित 'फेमिलियर टच' या अमेरिकन ड्रामा फिल्मला सर्वोत्कृष्ट पदार्पण फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार रोमानियाच्या बोगदान मुरेसानुला देण्यात आला आहे. 'द न्यू इयर दॅट नेव्हर केम' या चित्रपटासाठी त्यांना हा सन्मान मिळाला. तर बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसी याला या महोत्सवात फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयरने सन्मानित करण्यात आले.
अमेरिकन चित्रपट निर्माती सारा फ्रेडलँडचा चित्रपट 'फेमिलियर टच' हा दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट म्हणून घोषित झाला. याशिवाय स्वीडिश दिग्दर्शक लेवान अकिन यांच्या क्रॉसिंग या चित्रपटाला ICFT UNESCO गांधी पदक मिळाले आहे.
ईफ्फी (IFFI )2024 विजेत्यांची यादी
- गोल्डन पीकॉक (सर्वोत्कृष्ट चित्रपट): टॉक्सिक (लिथुआनियन भाषा)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: वेस्टा माटुलिएट आणि इवा रुपीकाईट (टॉक्सिक)
- सर्वोत्कृष्ट अभिनेता: क्लेमेंट फेव्यू (होली काऊ)
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक: बोगदान मुरेसानु (द न्यू इयर दॅट नेव्हर केम)
- स्पेशल ज्युरी अवॉर्ड: लुईस कौरवोझियर (होली काऊ)
- विशेष उल्लेख (सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरुष): अॅडम बेसा (हू डू आई बिलॉन्ग टू)
- सर्वोत्कृष्ट वेब सिरीज: लंपन (मराठी भाषा)
- फीचर फिल्म डायरेक्टरसाठी सर्वोत्कृष्ट पदार्पण: सारा फ्रेडलँड (फॅमिलियर टच)