मुंबई - कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट सध्या रिलीज झालाय. या चित्रपटाला संमिश्र रिव्ह्यू मिळाले आहेत. परंतु बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई होऊ शकलेली नाही. पहिल्या विकेंडला एकूण कमाई 10 कोटी 45 लाखापर्यंत पोहोचली आहे. हा सिनेमा 60 कोटीच्या बजेटमध्ये बनला असल्याचं सांगितलं जात. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये अनेक अडथळे आले आणि त्यामुळे आर्थिक फटकाही बसल्यानं कंगनानं आपली प्रॉपर्टी गहान ठेवून हा सिनेमा बनवला आहे. या चित्रपटाला पंजाबमधून मोठा विरोध झाला, विरोधी पक्षांनी चित्रपट प्रचारकी असल्याची टीका केली आहे. यापार्श्वभूमीवर कंगनानं शुभंकार मिश्रा यांच्या यूट्यूबवरील ब्रॉडकास्टमध्ये अनेक खुलासे केले आहेत. याध्ये तिनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अद्याप भेटून चर्चा केली नसल्याचाही खुलासा केल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय.
पंजाबी गायक दिलजीत दोसंझ यानं काही काळापूर्वी एक भूमिका घेताना हा देश कुणाच्या बापाचा नसल्याचं' म्हटलं होतं. तरीही त्याच्याशी जुळवून घेण्यात आलं. काही दिवसापूर्वी तर दिलजीत यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन गप्पाही मारल्या होत्या. याची आठवण करुन दिल्यानंतर कंगनाला विचारण्यात आलं की तिनं यापूर्वी किती वेळा पंतप्रधानांना भेटली आहे. यावर ती म्हणाली की, 'मला त्यांना भेटायची इच्छा आहे. यापूर्वी त्यासाठी प्रयत्नही केले आहेत. परंतु 2024 पासून तिला एकदाही पंतप्रधानांशी भेटता, बोलता किंवा चर्चाही करता आलेली नाही.' नरेंद्र मोदी जेव्हा कंगनाच्या मंडी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते. तेव्हा ती मंचावर त्यांच्या शेजारी बसली होती. तिनं पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागतही केलं होतं. मात्र त्याही वेळी त्यांनी एकमेकांशी बातचीत केली नव्हती. केवळ त्यांच्याबरोबर तिला सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी फोटो काढण्याची संधी मिळाली होती.