मुंबई : टीव्ही अभिनेत्री हिना खान गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रकृतीबाबत चर्चेत आहे. नुकताच एक रिपोर्ट समोर आला आहे, यामध्ये तिच्या तब्येतीच्या कारणास्तव, 2024 मध्ये गुगलवर हिना खानला अनेक लोकांनी सर्च केलं होतं. जगातील टॉप 10 सर्वाधिक सर्च केलेल्या अभिनेत्यांमध्ये तिचा समावेश करण्यात आला आहे. आता यावर हिनाची प्रतिक्रिया आली आहे. गुरुवारी हिना खाननं इंस्टाग्राम स्टोरीवर कृतज्ञता व्यक्त करत तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मी पाहिलं की, अनेक लोक स्टोरी लिहून नवीन घडामोडीबद्दल माझे अभिनंदन करत आहेत. मात्र खर सांगायचं झालं तर ही माझ्यासाठी कोणतीही उपलब्धी नाही आणि यात काही अभिमानाची गोष्ट नाही.'
हिना खानची पोस्ट व्हायरल : यानंतर तिनं पुढं लिहिलं, 'इंटरनेटवर कोणालाही त्यांच्या आजारपणामुळे आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे गुगलवर सर्च करावे लागू नये, अशी माझी इच्छा आणि प्रार्थना आहे.' या कठीण काळात माझ्या प्रवासाबद्दल लोकांच्या आदराचे मी नेहमीच कौतुक केले आहे. माझ्या कामाबद्दल आणि कामगिरीबद्दल मला ओळखलं जावं असे मला वाटते. जसे डाइग्नोसिस पूर्वीच्या दरम्यान माझ्याबद्दल होते.' आता हिनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.