बेंगळुरू - Hamare Barah film : कर्नाटक राज्य सरकारनं 'हमारे बारह' चित्रपटाच्या रिलीज किंवा प्रसारणावर दोन आठवड्यांसाठी किंवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंदी घातली आहे. हा निर्णय कर्नाटक सिनेमा नियमन कायदा 1964, कलम 15(1) आणि 15(5) नुसार घेण्यात आला आहे.
'हमारे बारह'च्या रिलीजमुळे राज्यात जातीय तेढ निर्माण होईल, असा दावा कर्नाटक सरकारनं केला आहे. अनेक अल्पसंख्याक संघटना आणि शिष्टमंडळांच्या विनंतीचा विचार करून आणि ट्रेलर पाहिल्यानंतर अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला. हा चित्रपट 7 जून 2024 रोजी देशभरात प्रदर्शित होणार होता.
'हमारे बारह' चित्रपटामध्ये वाढत्या लोकसंख्येची थीम दाखवण्यात आली आहे. या कथेसाठी अल्पसंख्यांक कुटुंब निवडण्यात आले असून धर्मानेच मुलं जन्माला घालण्याचा अधिकार दिला आहे, याचं समर्थन करण्यात आलंय. सरकारच्या कायद्यापेक्षाही धर्माचा कायदा कसा प्रभावी आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न कथानकातून करण्यात आला आहे. चित्रपटाचं बोल्ड कथन आणि विचारप्रवर्तक थीम यामुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.
अन्नू कपूर, मनोज जोशी आणि परितोष त्रिपाठी यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटानं लोकांच्या कल्पकतेचा आणि अपेक्षेचा वेध घेतला आहे. या चित्रपटाचं आधी नाव 'हम दो हमारे बारह' असं सुरूवातीला ठेवण्यात आलं होतं. मात्र यांवर आक्षेप घेण्यात आल्यानंतर याचे शीर्षक बदलून 'हमारे बारह' असं करण्यात आलं.
कर्नाटक राज्यात रिलीला स्थगिती लागू केल्यामुळे चित्रपटाच्या निर्मिती आणि वितरणामध्ये लक्षणीय गुंतवणूक केलेल्या निर्मात्यासमोर मोठी चिंता निर्माण झाली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाला आव्हान देणाऱ्या विशिष्ट धार्मिक समुदायाच्या कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर हा कायदेशीर अडथळा निर्माण झाला.