मुंबई Hamare Baarah Film : सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला हमारे बारह चित्रपट प्रदर्शित करायला बुधवारी उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं स्थगिती दिली होती. याप्रकरणी 10 जूनला नियमित खंडपीठासमोर पुढील सुनावणी होणार होती. मात्र, गुरुवारी सकाळी चित्रपटाचे दिग्दर्शक रवी गुप्ता व इतरांनी न्यायालयासमोर याप्रकरणी तत्काळ सुनावणी करण्याची मागणी केली. या सुनावणीत चित्रपटावरील स्थगिती उठवली. न्यायमूर्ती कमल खता व न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर गुरुवारी याबाबत सुनावणी झाली. खंडपीठानं याबाबत सेन्सॉर बोर्डाच्या तीन सदस्यीय समितीनं हा चित्रपट पाहून यात घेण्यात आलेल्या आक्षेपांवर आपलं निरीक्षण शुक्रवारी सकाळी 9 वाजता खंडपीठाला कळवावे, असे निर्देश दिले आहेत. या समितीनं नमूद केलेल्या निरीक्षणानंतर खंडपीठ या याचिकेवर निर्णय घेईल, असं स्पष्ट करण्यात आले.
काय होता आक्षेप : या चित्रपटाबाबत बुधवारी न्यायमूर्ती एन. आर. बोरकर व न्यायमूर्ती कमल खता यांच्या सुटीकालीन खंडपीठासमोर सुनावणी झाली होती. या प्रकरणी राज्यातर्फे सहाय्यक सरकारी वकील अॅड कविता सोळुंके उपस्थित होत्या. अॅड अद्वैत सेठना यांनी सेन्सॉर बोर्डाची बाजू मांडली. तर याचिकाकर्त्यांतर्फे अॅड मयूर खांडेपारकर यांनी बाजू मांडली. मुस्लिम समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या कुराणातील आयत क्रमांक 223 चा दाखला देऊन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जे संवाद तोंडी घालण्यात आले आहेत ते पूर्णतः चुकीचे आहेत. सदर आयतचा प्रत्यक्षात असलेला अर्थ पूर्णतः चुकीचा दाखवून मुस्लिम समाजाची व मुस्लिम महिलांची बदनामी करण्याच्या दृष्टीनं हे संवाद तयार करण्यात आले आहेत, असं मत याचिकाकर्त्यानं नमूद केलं आहे.
"न्यायालयानं दिलेल्या आदेशानं थोडेसं आश्चर्य वाटलं. सेन्सॉर बोर्डाचा सदस्य त्या समितीत असण्याऐवजी धर्मगुरु किंवा इस्लामच्या अभ्यासकाचा समावेश करण्याची गरज होती. या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करत आहोत." - अजहर तांबोळी, याचिकाकर्ता