मुंबई : 'बिग बॉस 18' मध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते सामील झाल्यानंतर आपल्या स्टाईलनं त्यांनी इतर स्पर्धकांना विश्वासात घ्यायला सुरुवात केली आहे. प्रेक्षकांनाही चर्वितचर्वणासाठी भरपूर मसाला सदावर्तेंकडून मिळत आहे. आपला तत्कालीन मविआ (महाविकास आघाडी) सरकारकडून एन्काऊंटर होणार होता आणि जेलमधील 'आरएसएस'च्या डॉक्टरानं आपले प्राण वाचवण्यास मदत केल्याचा धक्कादायक दावा सदावर्ते यांनी 'बिग बॉस'मध्ये केला आहे.
कराचीहून धमकीचा फोन : व्यक्तिमत्व आणि वादग्रस्त विधानांमुळं अॅड. सदावर्ते कायम चर्चेत असतात. त्यांनी 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री केल्यापासूनच आपल्या लौकिकाला साजेसं वर्तन सुरु केलं आहे. सदावर्ते यांनी इतर स्पर्धकांवर छाप पाडण्यासाठी स्वतःचं गुणवर्णन सुरू केलं आहे. आपण 'डाकू' खानदानातील आहोत, असं वक्तव्य सदावर्ते यांनी पुन्हा एकदा केलं आहे. आईला मी डॉक्टर व्हावं, असं वाटत असल्यामुळं मी डेंटीस्ट झालो आणि वडिलांना खानदानाचा लौकिक कायम राहावा वाटत असल्यामुळं वकील झाल्याचं त्यांनी सांगितलं. दाऊद इब्राहिमच्या विरोधात वकील म्हणून सतत लढत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. इतकंच नाही तर जेव्हा आपण 'बिग बॉस'मध्ये प्रवेश करत होतो, तेव्हा कराचीहून धमकीचा फोन आल्याचाही दावा त्यांनी केला.
माझ्यामुळंच मविआ सरकार पडलं : उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं सरकार खाली पाडण्यासाठी आपणच मेहनत घेतली असल्याचं व त्यामुळेच महाराष्ट्रात विद्यमान शिंदे सरकार आल्याचाही दावा त्यांनी केला. सरकारकडून आपल्या जीवाला कसा धोका होता, याचं रसभरीत वर्णन त्यांनी स्पर्धक सहकाऱ्यांपुढं केलंय.
माझा एन्काऊंटर होणार होता : 'बिग बॉस'मध्ये बोलताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या बाबतीत मला मास्टरमाईंड बनवलं होतं. जसे तुम्ही तिर्थयात्रेला जाता, तशी मला जेल यात्रा झाली होती. मला जामीन मिळत नव्हता तेव्हा मला घ्यायला पोलीस आले होते. तेव्हा माझा एन्काऊंटर होणार होता. कारण त्या पोलिसवाल्याला मी आवडतच नव्हतो. जेलमध्ये 'आरएसएस'चे एक डॉक्टर होते, त्यांना मी म्हटलं, मी इथून निघालो, तर हे मला संपवून टाकतील. अडीच वाजल्यानंतर माझ्या जामीनाबद्दल कोर्टात सुनावणी होईल त्यामुळे तुम्ही मला चार वाजेपर्यंत इथून बाहेर जाऊ देऊ नका. तुम्ही मला इथंच सलाईन लावून ठेवा. कारण माझा ताबा पोलिसांना मिळाला होता. असं करत तीन वाजता हा खटला हायकोर्टमध्ये निघाला. त्या काळात मी, अर्णब गोस्वामी आणि कंगनाजी तिघंच सरकारच्या विरोधात संघर्ष करत होतो. तिघांनीही खूप सहन केलं. पैकी मला आणि अर्णबला जेल झाली.''
खंडाळ्यामध्ये एन्काऊंटर करणार होतो : "त्यावेळी कोर्टानं विचारलं की माझा ताबा पोलिसांकडं आहे का? तेव्हा पोलीस म्हणाले की, नाही ते (सदावर्ते) जेलमधील हॉस्पिटलमध्ये आहेत. तेव्हा कोर्टानं म्हटलं की, मी त्यांना अॅन्टिसिपेटरी बेल देत आहे. थोड्या वेळात डॉक्टर आले आणि म्हणाले गुणरत्नजी, मी जेलमध्ये सुपरिटेंडंच्या चेंबरमध्ये पाहिलं की तुम्हाला जामीन मिळाला आहे. त्यांनी माझ्या सलाईन वगैरे फटाफट काढल्या आणि मला अंडा सेलमध्ये पाठवलं. त्यावेळी माझ्या मुलीनं पेननं अर्ज केला की, माझ्या वडिलांना जामीन मिळाला आहे, तिनं त्या ऑर्डरचा फोटो त्याला जोडला आणि भारत सरकारच्या होम मिनिस्ट्रीला पाठवला. अशा तऱ्हेनं मी सुटलो. काही वेळानं माझं स्टेटमेंट घेण्यासाठी मला बोलवलं तेव्हा एक सिनियर इन्स्पेक्टर म्हणाला की, तुला जीवदान मिळालंय, कारण त्यावेळी जर आम्ही तुला नेलं असतं तर आम्ही तुझा खंडाळ्यामध्ये एन्काऊंटर करणार होतो," असा दावा सदावर्ते यांनी केला.
चर्चेला नवा मसाला : गुणरत्न सदावर्ते यांच्या या खळबळजनक दाव्यानंतर महाराष्ट्रात अनेक तर्क वितर्क लढवले जाऊ शकतात. अनेकांना हा सदावर्तेंचा प्रसिद्धीसाठी स्टंट असल्याचं वाटू शकतं. तर समर्थकांना या प्रकरणातून चर्चेला नवा मसाला मिळू शकतो. एकंदरीत 'बिग बॉस'च्या घरात सदावर्तेंची एन्ट्री अशा चर्चांमुळे गाजत आहे.
हेही वाचा -
- बिग बॉसमध्ये सदावर्तेंनी उधळले 'गुण', वकिलाचा अवतार पाहून बिथरले स्पर्धक
- गुणरत्न सदावर्तेसह 18 स्पर्धक आणि गाढवाची 'बिग बॉस' 18 मध्ये एन्ट्री - Bigg Boss 18 Contestants List