मुंबई - ग्लोबल स्टार अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लगीन घाईत गुंतली आहे. तिचा रॉकस्टार पती निक जोनास त्याच्या कुटुंबासह या लग्नाला हजर राहिला आणि भारतीय विवाह सोहळ्याचा आनंद घेताना दिसला. आज, ८ फेब्रुवारी रोजी, प्रियांकाने तिच्या भावाच्या लग्नाचे नवीनतम फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
शनिवारी प्रियांकानं तिच्या इंस्टाग्रामवर सिद्धार्थच्या लग्नाच्या सात फेऱ्यांपर्यंतची झलक शेअर केली. पोस्टच्या पहिल्या स्लाईडमध्ये, प्रियांकानं सिद्धार्थच्या जयमालाची झलक दाखवली आहे. यामध्ये वधू-वरांवर फुलांचा वर्षाव होताना दिसत आहे. लग्नाचा एक टप्पा पार केल्यानंतर हे जोडपं खूप आनंदी दिसत आहे.
दुसऱ्या स्लाईडमध्ये, वधू आणि वराच्या कुटुंबाचा एक खास फोटो दिसत आहे. तिसऱ्या स्लाईडमध्ये वधू आणि वराची एन्ट्री दाखवली आहे, ज्यामध्ये प्रियांका तिच्या भावाला स्टेजवर घेऊन जाताना दिसत आहे. यामध्ये ती आपल्या होणाऱ्या भावजईला मिठी मारताना दिसत आहे.