मुंबई - National Award Winning Films:70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये जिंकलेले 7 हिंदी- साऊथ चित्रपट सध्या चर्चेत आहेत. राष्ट्रीय पुरस्कार 2022च्या विजेत्यांची 16 ऑगस्ट रोजी घोषणा करण्यात आली. यामध्ये 2022-2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या फीचर आणि नॉन फीचर हिंदी-साऊथ चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. चित्रपटांमध्ये 'पोन्नियन सेलवन पार्ट 1', 'गुलमोहर', 'ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा', 'कांतारा', 'अत्तम' आणि 'ऊंचाई' यांचा समावेश आहेत. हे सातही चित्रपट तुम्ही आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते हिंदी चित्रपट
'ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा' :
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट अभिनीत 'ब्रह्मास्त्र पार्ट 1 शिवा'ला अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक (AVGC) श्रेणीतील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच या चित्रपटाला संगीत देणारे, प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय गायक अरिजित सिंगला 'केसरिया' गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट तुम्ही डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
'ऊंचाई' : अभिनेता अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'उंचाई' चित्रपटातून नीना गुप्ता यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा चित्रपट झी 5वर उपलब्ध आहे.
'गुलमोहर' :अभिनेत्री शर्मिला टागोर आणि मनोज बाजपेयी स्टारर 'गुलमोहर' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा (हिंदी) राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय मनोज बाजपेयीला स्पेशल मेन्शन कॅटेगरीत पुरस्कारही देण्यात आला आहे. या चित्रपटाचे संवाद अर्पिता मुखर्जी आणि राहुल व्ही चित्तेला यांनी लिहिले आहेत, ज्यामुळे दोघांना सर्वोत्कृष्ट संवाद श्रेणीत राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. 'गुलमोहर' हा तुम्हाला डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहता येईल.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते साऊथ चित्रपट :
'कांतारा' : 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या लोकप्रिय चित्रपट 'कांतारा'नं भारतीय चित्रपटसृष्टीला हादरवून सोडलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन कन्नड स्टार ऋषभ शेट्टी यांनी केलं असून तेच या चित्रपटाचा मुख्य भूमिकेत दिसले आहे. ऋषभ शेट्टीला 'कांतारा' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. हा चित्रपट तामिळ, तेलुगू, मल्याळम भाषेत प्राइम व्हिडिओवर आणि हिंदीमध्ये नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
'पोनियान सेल्वन पार्ट 1' :तामिळ फिल्म इंडस्ट्रीतील मणिरत्नम दिग्दर्शित 'पोनियान सेल्वन पार्ट 1' या चित्रपटाला चार विभागांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. यात सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपट, सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी स्कोर (एआर रहमान), सर्वोत्कृष्ट छायांकन (रवि वर्मन), सर्वोत्कृष्ट ध्वनी डिझाइन (आनंद कृष्णमूर्ती) यांचा समावेश आहे. हा चित्रपट तुम्ही प्राईम व्हिडिओवर पाहू शकता. या चित्रपटात चियान विक्रम, जयम रवी, ऐश्वर्या राय, त्रिशा कृष्णन आणि शोभिता धुलिपाला यांनी उत्कृष्ट अभिनय केला आहे.
'तिरुचित्रामबलम' : तामिळ अभिनेता धनुष आणि नित्या मेनन स्टारर रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'तिरुचित्रामबलम' खूप लोकप्रिय झाला होता. या चित्रपटासाठी नित्या मेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. गुजराती चित्रपट 'कच्छ एक्सप्रेस' अभिनेत्री मानुषी पारेखबरोबर ती हा पुरस्कार शेअर करेल. जानी मास्टर आणि सतीश कृष्णन यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. 'तिरुचित्रामबलम' हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर पाहू शकता.
अत्तम :मल्याळम चित्रपट 'अत्तम'ला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संपादन आणि सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कारही देण्यात आला आहे. आनंद एकर्षी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे.
हेही वाचा :
- 70 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार: विजेत्यांच्या नावाची घोषणा, जाणून घ्या कोण आहे सर्वोत्कृष्ट अभिनेता, कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार - 70th National Awards Winners