मुंबई - आजपर्यंत प्रेमाच्या गोष्टी असंख्यावेळा रुपेरी पडद्यावर झळकल्या आहेत. प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट असून अनादी काळापासून मानवी नात्याला बांधून ठेवण्याचं काम यामुळं घडून येतं. मराठी प्रेक्षकांची मनं जिंकण्यात प्रेमाची गोष्टी यशस्वी झाली होती. 2013 मध्ये अतुल कुलकर्णी आणि सागरिका घाटगे यांच्या भूमिका असलेला प्रेमाची गोष्टी हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाचा पुढचा भागा आता 12 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ ही दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची अनोखी आणि भावनाप्रधान गोष्ट होती. आता याच्या दुसऱ्या भागात काय असेल याची उत्सुकता लागून राहिली आहे.
प्रेमाच्या गोष्टी सांगणारा दिग्दर्शक सतीश राजवाडे- आता 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे. या चित्रपटात ललीत प्रभाकर, ऋचा वैद्य आणि रिद्धिमा पंडित प्रमुख भूमिकेत आहेत. सतीश राजवाडेंच्या या नव्या प्रेम कथेत काही आंचबित करणारी गोष्ट असेल याची हमी प्रेक्षकांना वाटते. राजवाडे यांचा प्रेमाची गोष्ट बनवण्यात हातखंडा आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ या गाजलेल्या प्रेमकथेचे तीन चित्रपट त्यांनी दिग्दर्शित करुन हे यापूर्वीच सिद्ध केलंय. ‘प्रेमाची गोष्ट’, आणि ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटांतूनही त्यांनी याबाबतीत आपण माहीर असल्याचं दाखवून दिलंय.