मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या सारंगी वादनानं लाखो रसिकांना मंत्रमुग्ध करणारे 'पद्मविभूषण' पंडित राम नारायण यांचं शुक्रवारी (8 नोव्हेंबर) रात्री मुंबईत निधन झालं. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राम नारायण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी जगविख्यात सारंगीवादक 'पद्मविभूषण' पंडित राम नारायण यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे. पंडित राम नारायण यांनी आपल्या अद्भुत वादनातून सारंगी हे वाद्य आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले. त्यांच्या सारंगीचे स्वर हृदयस्पर्शी व स्वर्गीय आनंद देणारे होते. पंडित राम नारायण यांनी देश विदेशात अनेक उत्तमोत्तम शिष्य घडवले व आपले ज्ञान मुक्तहस्ताने वाटले. त्यांचे दैवी संगीत त्यांच्या पश्चात देखील शतकानुशतके कायम राहील. त्यांच्या निधनामुळे सारंगीतील एक पर्व संपले आहे. पंडित राम नारायण यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व आपल्या शोकसंवेदना त्यांचे कुटुंबीय, शिष्यपरिवार व संगीत प्रेमींना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
पंडित राम नारायण याच्या निधनानं संगीत क्षेत्रातील एका महान कलाकारास आपण मुकलो आहोत, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.
मूळचे राजस्थानच्या उदयपूरमधील राम नारायण हे 50 च्या दशकात मुंबईत आले आणि एकल सारंगी वादक म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांनी सारंगी वादनाच्या विविध शैली विकसित करून जागतिक स्तरावर कीर्ती मिळवली. संगीत क्षेत्रातील नवनव्या कलाकारांना पंडित राम नारायण यांचं कार्य नेहमीच प्रेरणा देणारं ठरेल, असं मत मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केलं आहे.
'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित : पंडित राम नारायण यांचा जन्म 25 दिसंबर 1927 साली उत्तर-पश्चिम भारतातील उदयपूर जवळील आमेर या गावी झाला. त्यांचे पणजोबा मोठे गायक होते. पंडित राम नारायण हे पन्नासच्या दशकात मुंबईत आले. यानंतर त्यांनी 1956 मध्ये कॉन्सर्ट सोलो आर्टिस्ट म्हणून काम केलं. पुढं ऑल इंडिया रेडिओसाठीही त्यांनी काम केलं. तसंच काही अल्बम सुद्धा त्यांनी रेकॉर्ड केले. त्यांनी 1964 साली आपले मोठे भाऊ चतुर लाल यांच्यासह अमेरिका आणि युरोप येथे पहिले आंतरराष्ट्रीय दौरे संगीतरसिकांसाठी संस्मरणीय ठरवले. पंडित राम नारायण यांनी देशातील आणि विदेशातील अनेक विद्यार्थ्यांना सारंगी वादनाचं प्रशिक्षण दिलंय. संगीत क्षेत्रातील त्यांच्या या बहुमूल्य योगदानामुळं भारत सरकारनं त्यांना 2005 साली 'पद्मविभूषण' या देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वोच्च सन्मानाने गौरवलं.