मुंबई - अभिनेत्री दीपिका पदुकोणनं 8 सप्टेंबर रोजी तिच्या पहिल्या अपत्याला जन्म दिला. रणवीर सिंग आणि दीपिका या दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झालं. दीपिकानं आपल्या मुलीचं नाव 'दुआ' ठेवलं असून ती आता 2 महिन्यांची आहे. दीपिका आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी दिसली. पंजाबी गायक दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये दीपिका पदुकोण अचानक अवतरली आणि तिनं आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं. आई झाल्यानंतर दीपिका पदुकोण तिच्या चाहत्यांमध्ये पोहोचण्याची ही पहिलीच वेळ आहे. बेंगळुरू हे दीपिका पदुकोणचं मूळ गाव आहे. दीपिका पदुकोण आणि दिलजीत दोसांझ यांच्या कॉन्सर्टचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
या इव्हेन्टमध्ये दीपिका पदुकोण कूल कॅज्युअल लूकमध्ये दिसत आहे. दीपिका पदुकोणनं पांढऱ्या टी-शर्टवर निळ्या रंगाचा डेनिम परिधान केला होता. दिलजीत दोसांझच्या बेंगळुरू कॉन्सर्टमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळाली. साऊथ इंडियामध्येही तो किती लोकप्रिय आहे याचा प्रत्यय यामुळं आला. बंगळुरूमध्ये दीपिका पदुकोणही खूप लोकप्रिय आहे. दिलजीतच्या कॉन्सर्टमध्ये ती पोहोचेल, अशी कल्पनाही तिच्या चाहत्यांनी केली नव्हती.