मुंबई - Arjun Kapoor vs Allu Arjun :अभिनेता अजय देवगण, करीना कपूर खान, अक्षय कुमार, दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि टायगर श्रॉफ स्टारर कॉप ॲक्शन चित्रपट 'सिंघम अगेन'ची रिलीज जवळ आली आहे. याआधी रोहित शेट्टीनं त्याच्या बहुप्रतीक्षित 'सिंघम अगेन'मधील खलनायकचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहित शेट्टीनं त्याच्या ॲक्शन कॉप चित्रपटासाठी अर्जुन कपूरची खलनायक म्हणून निवड केली आहे. आज 14 फेब्रुवारी रोजी अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक समोर आला आहे. 'सिंघम अगेन' या चित्रपटातील अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
अर्जुन कपूरचा फर्स्ट लूक प्रदर्शित :अर्जुन कपूरचा हा लूक साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन स्टारर 'पुष्पा' चित्रपटाच्या लूकची कॉपी असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. दुसरीकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील काही कलाकार अर्जुनचा फर्स्ट लूक हा जबरदस्त असल्याचं म्हणत आहेत. 'पुष्पा'मध्ये हाच लूक अल्लू अर्जुनचा होता. त्याचा हा लूक प्रचंड गाजला होता. याशिवाय असाच लूक साऊथ स्टार नानी देखील असल्याचं अनेकजण म्हणत आहेत. 'सिंघम अगेन'मध्ये अर्जुन कपूर शक्तिशाली अंदाजात दिसणार आहे. फर्स्ट लूकमध्ये अर्जुनचा चेहरा रक्तानं माखलेला दिसत आहे. याशिवाय त्याची कुरळे केसांची हेअरस्टाईल पाहून अनेकांना 'पुष्पा' या चित्रपटाची आठवण झाली आहे.