मुंबई Chhatrapati Shivaji Maharaj : महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सह्याद्री वाहिनीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायक चित्रपट पाहण्याची पर्वणी रसिकांना उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक दिगपाल लांजेकर दिग्दर्शित `फत्तेशिकस्त' चित्रपटाने (Fatteshikast Movie) आज (२४ फेब्रुवारी) दुपारी दीड वाजता या उपक्रमाचा प्रारंभ होणार आहे. तरी फत्तेशिकस्त हा सिनेमा राज्यातील रसिकांनी आवर्जून पाहावा असे आवाहन महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक डॉ. अविनाश ढाकणे यांनी केलंय.
महाराजांची शिकवण व प्रेरणा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षानिमित्तानं उत्साहात ठिकठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण व प्रेरणा नव्या पिढीला मिळत आहे. आताच 19 फेब्रुवारीला राज्यासह देशात आणि परदेशातही छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
प्रेरणादायक चित्रपट दाखविण्याचा स्तुत्य उपक्रम : शिवरायांची प्रेरणा रसिकप्रेक्षकांना मिळावी, यासाठी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुंनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आणि सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित निवडक प्रेरणादायक चित्रपट दाखविण्याचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी सांस्कृतिक विकास महामंडळामार्फत राबविण्यात येतोय.
चित्रपटानं रचला इतिहास : दिगपाल लांजेकर दिग्दर्शित 'फत्तेशिकस्त' या गाजलेल्या मराठी सिनेमानं एक नवा इतिहास रचलाय. तमाम शिवभक्त, मराठी जनता आणि सिनेरसिकांचा उर अभिमानानं भरून यावा अशी देदीप्यमान वाटचाल करणाऱ्या या सिनेमाचा समावेश 'मराठा लाईट इन्फंट्री'च्या अर्काइव्हमध्ये करण्यात आलाय. ए. ए. फिल्म्स यांच्या सहकार्याने आलमंड्स क्रिएशन्स प्रस्तुत, दिगपाल लांजेकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'फत्तेशिकस्त' हा सिनेमा १५ नोव्हेंबर २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील जाणकारांनी केलेल्या कौतुकाच्या वर्षावामुळं हा सिनेमा सर्वदूर पोहोचला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचं दर्शन घडवणारा 'फत्तेशिकस्त' आपल्या अर्काइव्हमध्ये असावा असा निर्णय 'मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट'नं घेतला.
हेही वाचा -
- आग्रा येथे शिवजयंती उत्साहात साजरी; प्रतापगडाच्या संवर्धनासाठी पन्नास कोटींचा निधी, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती
- राज्यशस्त्र म्हणून दांडपट्ट्याला मान्यता; मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
- काश्मीर खोऱ्यात हिमवर्षावात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती! सैन्याचा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर येईल काटा