मुंबई - elvish yadav : प्रसिद्ध यूट्यूबर एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एल्विश यादवला 23 जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. हे प्रकरण रेव्ह पार्ट्यांमध्ये नशा आणि सापाच्या विषाचा वापर करण्यासंबंधातलं आहे. एल्विशला 23 जुलै रोजी लखनौला चौकशीसाठी बोलावलं आहे. यापूर्वी ईडीनं एल्विशला नोटीस देऊन 8 जुलै रोजी बोलावलं होतं, मात्र त्यानं परदेशात असल्याचं कारण सांगत ईडीसमोर हजर होण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली होती. यानंतर ईडीनं मे महिन्यात एल्विशविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता.
एल्विश यादवची होईल चौकशी :दरम्यान एल्विशच्या मालकीच्या महागड्या गाड्यांच्या ताफ्याचीही ईडी चौकशी करणार असल्याचेही आता समोर आलंय. मिळालेल्या माहितीनुसार, एल्विशवर मोठी कारवाई होऊ शकते. एल्विश यादवबरोबर ईडी मोठी हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊसच्या मालकांचीही चौकशी करणार असल्याचं समजत आहे. याआधी एल्विश यादवला नोएडा पोलिसांनी अटक केली होती. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. ईडी एल्विशवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. रेव्ह पार्ट्यांसाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केल्याचे अनेक आरोप एल्विशवर आहेत.