मुंबई - कार्तिक आर्यन स्टारर 'भूल भुलैया 3' आणि रोहित शेट्टी दिग्दर्शित मल्टीस्टारर 'सिंघम अगेन' हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलीज होऊन एक आठवडा झाला आहे. 1 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटांना दिवाळीच्या सुट्टीचा पुरेपूर लाभ मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर हे चित्रपट पहिल्या आठवड्यात २०० कोटींचा व्यवसाय करू शकले नसले तरी त्याच्या जवळपास पोहोचण्यात यशस्वी झाले आहेत.
कार्तिक आर्यनचा हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया 3' ने पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत अजय देवगणचा चित्रपट 'सिंघम अगेन'ला मागे टाकण्यात यश मिळवलं आहे. 'भूल भुलैया 3'ने केवळ सहाव्या दिवशीच नव्हे तर सातव्या दिवशीही सिंघम अगेनला पिछाडीवर टाकण्यात यश मिळवले.
'भूल भुलैया 3' ने पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी 9.50 कोटींचा व्यवसाय केला. तर अजय देवगणच्या चित्रपटानं केवळ 8.75 कोटींची कमाई केली. सहाव्या दिवशी, हॉरर कॉमेडीने 10.50 कोटींची कमाई केली, तर रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्स चित्रपटानं 10.25 कोटींचा व्यवसाय केला.
1 नोव्हेंबरला रिलीज झालेला रोहित शेट्टी दिग्दर्शित सिंघम अगेन हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3' चित्रपटापेक्षा पुढे राहिला. 'सिंघम अगेन'ने पहिल्या दिवशी 43.5 कोटी रुपयांची कमाई केली होती, तर 'भूल भुलैया 3'ने 36.6 कोटी रुपयांची कमाई केली होती. दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आणि पहिल्याच वीकेंडमध्ये १०० कोटींचा टप्पा पार केला. 'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' दुसऱ्या वीकेंडपर्यंत 200 कोटींचा टप्पा ओलांडतील असा अंदाज आहे.
'भूल भुलैया 3' आणि 'सिंघम अगेन' या दोन्ही चित्रपटांनी पहिल्याच आठवड्यात 150 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. 'भूल भुलैया 3' हा कार्तिक आर्यनचा सर्वात वेगवान 150 कोटींची कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अनीस बज्मी दिग्दर्शित चित्रपटानं पहिल्या आठवड्यात भारतीय बॉक्स ऑफिसवर एकूण 158.25 कोटी रुपये कमावले आहेत, तर रोहित शेट्टीच्या चित्रपटाने एकूण 173 रुपयांची कामाई केली आहे.