मुंबई - विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका असलेला 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय. १९ फेब्रुवारी रोजी 'शिवजयंती' दिनी महाराष्ट्रात सर्वभाषक प्रेक्षकांनी हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहाकडे मोर्चा वळवला. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची गाथा असलेला हा चित्रपट महाराष्ट्रात करमुक्त करावा अशी मागणी होत आहे. याविषयीचा प्रश्नही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला होता. परंतु महाराष्ट्रात मनोरंजन कर आकारला जात नाही, असं उत्तर देत त्यांनी लोकांना संभ्रमात टाकलं.
खरंतर, महाराष्ट्रामध्ये 'मराठी' चित्रपटांना करमुक्त करण्याचा निर्णय शासनाकडून पूर्वीच घेण्यात आला आहे. मात्र हिंदी चित्रपटांसाठी अशा प्रकारची सवलत देण्यात आलेली नाही. शिवाय 'छावा' हा हिंदी भाषेतील चित्रपट असल्यामुळे तो महाराष्ट्रात करमुक्त करण्याच्या निकषात बसत नाही. मुख्यमंत्री फडणवीसांना आपल्या वक्तव्यातून नेमकं काय म्हणायचं आहे, याविषयी तर्क लढवले जात आहेत. दरम्यान महाराष्ट्राच्या आधी गोवा आणि मध्य प्रदेश राज्यामध्ये 'छावा' चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९५ व्या जयंतीनिमित्त संभाजी महाराजांचा 'छावा' चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली होती. लागलीच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही राज्यात चित्रपट करमुक्त केला आहे.
संभाजी महाराजांच्या शौर्याची कथा असलेला 'छावा' हा चित्रपट गोवा आणि मध्य प्रदेशात करमुक्त झालाय. १४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. चित्रपटाचं कौतुक करताना मोहन यादव म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांचे पराक्रमी चिरंजीव छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' हा चित्रपट करमुक्त करण्यात येत आहे. यापूर्वी मोहन यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं होतं. शिवाजी महाराजांची देशभक्ती आणि बलिदान आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील, असे ते म्हणाले होते.
'छावा' करमुक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री काय म्हणाले? - गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिलं की, 'छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आणि बलिदानावर आधारित 'छावा' हा चित्रपट गोव्यात करमुक्त होत आहे हे जाहीर करताना मला आनंद होत आहे. हा चित्रपट 'देव, देश आणि धर्म' यासाठी मुघल आणि पोर्तुगीजांविरुद्ध लढणाऱ्या संभाजी महाराजांचे शौर्य आणि धाडस दाखवणारा आहे.
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट संभाजी महाराज यांची तेजोमय शौर्यगाथा सांगतो. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका विकी कौशलनं साकारली असून औरंगजेबाची भूमिका अक्षय खन्ना साकारत आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशीपर्यंत २०३.६८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला. दक्षिण भारतामध्येही 'छावा'ची क्रेझ पाहायला मिळत आहे. हिंदी भाषा नीट समजत नसतानाही लोक मोठ्या प्रमाणावर थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. हा चित्रपट दक्षिण भारतीय भाषामध्येही डबिंग करण्यात यावा, अशी मागणी होऊ लागला आहे. महाराष्ट्रासह देशभर इतर राज्यात चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
हेही वाचा -