मुंबई - Ayushmann Khurrana :लोकसभा निवडणूक 2024 सुरू होण्यासाठी आता फक्त तीन दिवस उरले आहेत. सार्वत्रिक निवडणुकीचा पहिला टप्पा 19 एप्रिलपासून सुरू होत आहे. यावेळच्या सार्वत्रिक निवडणुका सात टप्प्यात होणार असून शेवटचा टप्पा 1 जून रोजी होईल. यानंतर 4 जून रोजी निकाल येईल. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील नवीन उमेदवार कंगना रणौत लोकसभा निवडणूक लढवणार आहे. ती लोकसभा निवडणुकीमध्ये निवडून येईल की नाही हे पाहणं लक्षणीय ठरणार आहे. दरम्यान बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना देशाच्या नवीन संसद भवनात पोहोचला होता.
आयुष्मान खुराना नवीन संसदेत :आयुष्मान खुरानानं निवडणुका सुरू होण्याच्या तीन दिवस आधी नवीन संसदेतील त्याचे फोटो शेअर केले आहेत. त्यानं त्याचे फोटो शेअर करत पोस्टवर लिहिलं, 'नवीन संसद भवनात आल्यानं मला खूप चांगलं वाटलं, आपल्या लोकशाहीचे प्रतिनिधित्व करणारी ही भव्य इमारत पाहिल्यानंतर मला अभिमान वाटतो, यात आपला वारसा, संस्कृती आणि सन्मान आहे, जय हिंद.' आता आयुष्माननं शेअर केलेल्या पोस्टवर त्याला त्याचे चाहते अनेक प्रश्न विचारत आहे. एका चाहत्यानं या पोस्टवर लिहिलं, "आयुष्मान तू पण निवडणुकीत उभा असणार आहे का ? असेल तर कुठल्या पक्षाकडून आहेस." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "तू माझा आवडता अभिनेता आहे, पण खऱ्याकडून साथ देशील." आणखी एकानं लिहिलं, "नायक'च्या दुसऱ्या भागात हाच असणार." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी पोस्ट करत आहेत.