मुंबई - Ayushmann Khurrana And Sara Ali Khan : बॉलिवूडचा प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहर पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो आता चित्रपटसृष्टीला एक नवीन जोडी देणार आहे. करण जोहर हा आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांना एका चित्रपटासाठी एकत्र आणत आहेत. आयुष्मान आणि सारा अभिनीत या ॲक्शन कॉमेडी चित्रपटासाठी करण जोहरनं सिखिया एंटरटेनमेंटशी हातमिळवणी केली आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाची लवकरच घोषणा होणार आहे. आता ही जोडी रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.
सारा अली खान आणि आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट : आयुष्मान खुराना आणि सारा अली खान स्टारर या शीर्षकहीन ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आकाश कौशिक यांनी केलं आहे. या चित्रपटाच्या शूटिंगला लवकरच सुरुवात होणार आहे. करण जोहर आणि सिखिया एन्टरटेन्मेंटचा हा तिसरा चित्रपट आहे. आयुष्मान आणि सारा अली खान हे पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. आयुष्मान खुरानाबद्दल बोलायचं झालं तर, अलीकडेच तो सनी देओलबरोबर 'बॉर्डर 2' या चित्रपटात दिसणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. या चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबर 2024 मध्ये सुरू होईल. जेपी दत्ता आणि भूषण कुमार संयुक्तपणे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत.