मुंबई Ashok Saraf :अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार (Maharashtra Bhushan Award 2023) जाहीर झालाय. अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनं जिंकली आहेत. त्यांचा बहुरुपी अभिनय हा अनेकांना खूप आवडतो. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलंय. सराफ यांना विनोदाचा बादशहा, विनोदवीर म्हटलं जातं. प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करण्याचं कठीण कार्य त्यांनी अनेक वर्षे सातत्यानं केलं आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोहर जनमानसात उमटली आहे. हीच मोहोर महाराष्ट्रभूषण या पुरस्काराच्या रुपानं सराफ यांना मिळाली.
आंतर बँक नाट्यस्पर्धा : अशोक सराफ हे स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये कामाला होते. त्याकाळी बँकांमध्ये स्पोर्ट्स कोटा, कल्चरल कोटा वगैरे असायचे. त्यातून त्या-त्या खेळाडूंना अथवा कलाकारांना नोकरी मिळत असे. अशोक सराफ स्टेट बँकेतर्फे नाटक स्पर्धांतून काम करीत असत. त्याकाळी आंतर बँक नाट्यस्पर्धा खूप मानाची समजली जायची. त्यातून अनेक बँकांमधील अनेक उत्तम कलाकार मनोरंजन सृष्टीला लाभले आहेत. अमोल पालेकर, रीमा लागू, विवेक लागू, रमेश पवार, राजा गावडे, सुहास पळशीकर, मंगेश कुलकर्णी, प्रदीप पटवर्धन आणि अनेक उमदे कलाकार यातून उदयास आले. त्यातील एक प्रमुख नाव म्हणजे अशोक सराफ.
अशोक सराफ यांच्या जीवनातील टर्निंग पॉइंट :आंतरबँक नाट्यस्पर्धेमध्ये अशोक सराफ आणि रमेश पवार अभिनित 'म्ह्या' नावाची एकांकिका सादर केली होती. ही अफाट विनोदी एकांकिका होती आणि ती बघण्यासाठी साहित्य संघ सभागृहात मुंगी शिरायलाही जागा नव्हती. सतत हशे आणि टाळ्या पडत होत्या. त्या दिवशी 'अ स्टार वॉज बॉर्न'. अशोक सराफ यांच्या जीवनातील तो एक टर्निंग पॉइंट होता. काही दिवसांपूर्वी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांची अशोक सराफ यांच्यासोबत एका फिल्म पार्टीत भेट घडली होती. त्यांना त्यांची 'म्ह्या' बघितली होती असे सांगितल्यावर ते त्यांना म्हणाले होते की, ज्यांनी म्ह्या एकांकिकेचा ओरोजिनल शो पाहिला आहे ते खूप लकी आहेत. तो एकमेकाद्वितीय प्रयोग होता आणि तसा पुढे कधीच झाला नाही. ज्यांनी माझी म्ह्या एकांकिका पाहिलीय त्यांना मी सॅल्यूट करतो. त्यांनी कीर्तिकुमार यांना भर पार्टीत चक्क सॅल्यूट केला.